‘लाल परी’ला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय


मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्राची लाल परी अर्थात एसटी आर्थिक संकटात सापडल्याचे पहायला मिळत आहे. राज्यातील ठाकरे सरकारने याच एसटी महामंडळाला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी आर्थिक मदत जाहीर केली आहे. एसटी महामंडळाला राज्य सरकारकडून 600 कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिली.

एसटीची वाहतूक कोरोनाचं संकट आणि लॉकडाऊन यामुळे सुद्धा पूर्ण क्षमतेने सुरू नव्हती. त्यानंतर पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली आणि पुन्हा लॉकडाऊन लागू झाला. आता कुठे पुन्हा 50 टक्के आसन क्षमतेने वाहतूक सुरू झाली आहे. एसटीच्या उत्पन्नावर या सर्वांचा परिणाम झाला. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचाही प्रश्न समोर आला. आता राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार असल्यामुळे एसटीच्या 98 हजार कर्मचाऱ्यांचे रखडलेले वेतन देणे शक्य होणार आहे.

काही दिवसांपूर्वी एसटी महामंडळाकडून राज्य सरकारकडे आर्थिक मदतीसाठी एक प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावावर कर्मचाऱ्यांचे वेतन आणि इतर खर्चासाठी 600 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले होते.

परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी यापूर्वी देखील एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी शासनाकडुन तब्बल1 हजार कोटी रुपये एसटी महामंडळाला मिळवुन दिले होते. त्यातून गेल्या सहा महिन्यांमध्ये एसटीच्या कर्मचाऱ्यांना वेतन देणे शक्य झाले. एसटी महामंडळाकडून आपल्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.