‘गिनीज बुका’त नोंद; महिलेने एकाच वेळी दिला १० बाळांना जन्म


आजवर तुम्ही जुळी किंवा तिळी मुलांना जन्म दिल्याच्या बातम्या वाचल्या असतील. पण तुम्हाला जर कोणी एखाद्या महिलेने एकाच वेळी दहा बाळांना जन्म दिल्याचे सांगितले, तर तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही. पण खरोखरच असा प्रकार दक्षिण आफ्रिकेमध्ये घडला आहे. विशेष म्हणजे गिनीज बुकनेही एकाच वेळी १० बाळांना जन्म देणाऱ्या या महिलेची दखल घेतली आहे. एकाच वेळी दहा बाळांना जन्म देणाऱ्या महिलेचे गोसियामी धमारा सिटहोल असे नाव आहे.

यासंदर्भात दक्षिण आफ्रिकेमधील प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, एकाच वेळी ३७ वर्षीय गोसियामी धमारा सिटहोल यांच्या पोटी जन्माला आलेल्या १० बाळांमध्ये सात मुले आणि तीन मुलींचा समावेश आहे. डॉक्टरांनी या महिलेला गरोदर असतानाच सहा बाळे होतील, असा अंदाज व्यक्त केला होता. पण या महिलेच्या पोटात ७ जून रोजी फार दुखू लागल्याने तिच्यावर शस्त्रक्रीया करुन सिझेरियन पद्धतीने बाळांना जन्म देण्याचा निर्णय घेण्यात आला. या महिलेने एकाच वेळी दहा बाळांना जन्म दिल्यामुळे डॉक्टरांना आश्चर्य वाटत आहे. आम्हाला आठ बाळे होतील, असा अंदाज माझ्या पतीने व्यक्त केला होता, असे गोसियामी यांनी म्हटले आहे. सर्व बाळांची प्रकृती ठणठणीत असल्यामुळे कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण आहे.

गोसियामी यांनी दिलेल्या माहितीनुसार डॉक्टरांनी त्यांना गरोदर असतानाच सहा बाळांसंदर्भातील शंका बोलून दाखवली होती. तसेच याच कारणामुळे गोसियामी यांनी अधिक काळजी घ्यावी, असा सल्लाही डॉक्टरांनी दिला होता. थोडे सुद्धा बेजबाबदार वर्तन धोकादायक ठरु शकते, असे देखील डॉक्टरांनी गोसियामी आणि त्यांच्या पतीला सांगितले होते. याच कालावधीमध्ये गोसियामी एकदा आजारी पडल्या होत्या. पण रुग्णालयामध्ये त्यांनी उपचार घेतल्यानंतर त्यांना बरे वाटू लागलेले.

गोसियामी यांच्या मुलांची प्रकृती ठणठणीत असली, तरी काही दिवस त्यांना इनक्युबेटरमध्ये ठेवण्यात येणार आहे. याबाबत डेली मेल ऑनलाइनने दिलेल्या वृत्तानुसार गोसियामी यांना गरोदर असतानाच अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अनेकदा त्यांच्या पायांना आणि कमरेला त्रास व्हायचा. पण त्यांनी या साऱ्या संकटांना तोंड देत दहा बाळांना जन्म दिला. गोसियामी या एकाच वेळी सर्वाधिक मुलांना जन्म देणारी पहिली महिला ठरली आहे. गोसियामी यांना आधीच दोन लहान मुले आहेत.

आफ्रिका खंडातील माली या छोट्याश्या देशातील एका महिलेने काही आठवड्यांपूर्वीच एकाच वेळी नऊ बाळांना जन्म दिला होता. मोरक्को येथील रुग्णालयामध्ये या महिलेने एकाच वेळी नऊ बाळांना जन्म दिला होता. सर्व बाळांची प्रकृती ठणठणीत असल्याचे माली सरकारने सांगितले होते. या नऊ बाळांना जन्म देणाऱ्या २५ वर्षीय महिलेचे हालीमा सिसी असे नाव होते. हालीमा यांच्या नावे असणारा सर्वाधिक बाळांना एकाच वेळी जन्म देण्याचा विक्रम गोसियामी यांनी जवळजवळ महिन्याभराच्या कालावधीमध्ये मोडीत काढला आहे. हालीमा यांनी जन्म दिलेल्या नऊ बाळांमध्ये पाच मुली आणि चार मुलांचा समावेश होता.