नरेंद्र मोदींच्या व्यक्तिगत भेटीवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया


नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली असून राज्याशी संबंधित अनेक मुद्दे मांडले आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासोबत यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अशोक चव्हाणदेखील उपस्थित होते. सकाळी ११ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी सुरु झालेली ही बैठक जवळपास दीड तास सुरु होती.

दरम्यान उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्यात यावेळी वैयक्तिक भेट झाल्याचीही चर्चा होती. उद्धव ठाकरेंना भेटीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत यासंबंधी विचारण्यात आले असता त्यांना मी काही नवाज शरीफ यांच्या भेटीसाठी गेलो नव्हतो, असे उत्तर दिले. मोदींसोबत तुमची वैयक्तिक भेट झाली का असे उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आले असता ते म्हणाले की, ही गोष्ट मी कधी लपवलेली नाही आणि लपवण्याची गरज नाही. आम्ही आज राजकीयदृष्ट्या एकत्र नाही, पण याचा अर्थ नाते तुटले असा होत नाही आणि हेच मी काही दिवसांपूर्वी एका मुलाखती दरम्यान सांगितले होते. त्यामुळे भेटलो तर त्यात काही चुकीचे नाही. मी काही नवाज शरीफला भेटायला गेलो नव्हतो. माझ्या सहकाऱ्यांना मी पुन्हा जाऊन त्यांना भेटायचे असेल, असे सांगितले तर त्यात चुकीचे काय आहे?, अशी विचारणा उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.

त्यांचा मधल्या काळात फोन आला आणि सरकार चांगले काम करत असल्याचे सांगितले हे व्यक्तिगत बोलणच होते. आमची आजही वैयक्तिक भेट झाली. यावेळी त्यांनी विचारपूस केली. मी त्यांना सहकाऱ्यांसोबत आलो असून राज्याचे प्रश्न असल्याचे सांगितले, अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली. युती का तुटली ? असे विचारले असता दीड वर्षाने त्यावर उत्तर का द्यावे असे ते म्हणाले.