मंबईत आज किंवा उद्या होणार मॉन्सूनचे आगमन! वेधशाळेने वर्तवला अंदाज


मुंबई – मुंबईकरांना गेल्या चार महिन्यांपासून उन्हाळ्याचा आणि प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागलत आहे. पण, आता लवकरच मुंबईकरांना यातून दिलासा मिळणार आहे. कारण आज (मंगळवार) किंवा उद्या ९ जून रोजी मुंबईत मॉन्सूनचे आगमन होणार असल्याची आनंदाची बातमी कुलाबा वेधशाळेकडून देण्यात आली आहे.

महाराष्ट्रात तीन दिवसांपूर्वीच म्हणजे ५ जून रोजी मॉन्सूनचे आगमन झाले आहे. महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागामध्ये गेल्या दोन दिवसांत विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात मॉन्सून सक्रिय झाला आहे. पण, मुंबईकरांना अजूनही मॉन्सूनची प्रतिक्षा असून आज किंवा उद्या मुंबईकरांना मॉन्सूनचे स्वागत करता येणार असल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यासाठी अनुकूल असे वातावरण आता निर्माण झाल्याचे देखील कुलाबा वेधशाळेने स्पष्ट केले आहे.

मॉन्सूनचे मुंबईत आगमन होण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले असून मुंबईत आज किंवा उद्या मॉन्सूनचे आगमन होईल, अशी माहिती मुंबई वेधशाळेच्या वैज्ञानिक शुभांगी भुते यांनी दिली आहे.

दरम्यान, केंद्रीय हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार, लवकरच मुंबईसह महाराष्ट्राच्या उरलेल्या भागात, तेलंगणामध्ये आणि आंध्रप्रदेशमध्ये नैऋत्य मोसमी वारे मार्गक्रमण करतील. त्याचबरोबर ओडिशाचा काही भाग आणि पश्चिम बंगालमध्ये देखील काही भागांमध्ये येत्या २ ते ३ दिवसांमध्ये मॉन्सूनचे आगमन होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, पश्चिमेकडच्या वाऱ्यांचा जोर वाढल्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर, महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये पावसाची जोरदार हजेरी लागणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

मुंबईतील पावसाच्या आगमनासोबतच मुंबई महानगर क्षेत्रासह कोकणातीलल सर्व जिल्ह्यात ९ ते १२ जून या चार दिवसांच्या काळात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे या चार दिवसाच्या काळात सर्व प्रशासकीय यंत्रणांनी सज्ज आणि सतर्क राहून काम करण्याचे आणि समन्वय राखण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

या काळात कोरोनासह इतर कोणत्याही स्वरूपाच्या रुग्णसेवेत अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घेतांना धोकादायक इमारती, दरडग्रस्त भाग आणि लोलाईन एरियातील नागरिकांना गरजेनुसार सुरक्षितस्थळी हलवावे अशा सूचनाही त्यांनी दिल्या. हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने मुंबई महानगर क्षेत्र, कोकणातील सर्व जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. पालकमंत्र्यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची बैठक घ्यावी, या अतिवृष्टी काळात गरज पडल्यास मदतीसाठी तटरक्षकदल, नौदलाला तयार राहण्याची सूचना कळवण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले.