जर सरकारने दखल घेतली नाही, तर संपूर्ण राज्यभरात पाहायला मिळतील त्याचे परिणाम


बीड – आज बीड येथे शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठीच्या मोर्चाला सुरूवात झाली. विनायक मेटे यांनी यावेळी माध्यमांना प्रतिक्रिया देताना राज्य सरकारला इशारा दिला. जर सरकारने दखल घेतली नाही, तर त्याचे परिणाम संपूर्ण राज्यभरात पाहायला मिळतील, असे मेटे यांनी म्हटले आहे.

मोर्चाला झालेली गर्दी पाहता, तरूणांमध्ये मराठा आरक्षणाबाबत किती रोष आहे हे दिसत आहे. पण सरकारला हा रोष देखील दिसत नसल्यामुळे हे सर्वजण संघर्ष करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. जर याची दखल सरकारने घेतली नाही, तर त्याचे परिणाम संपूर्ण राज्यभरात पाहायला मिळतील. मी आता जसे आवाहन केले, तसेच आवाहन सुरूवातीपासून करत आहे. हा मूक मोर्चा नाही, घोषणा देत सरकारचे वाभाडे काढणारा मोर्चा आहे. अन्यायाला वाचा फोडणारा मोर्चा असल्याचे शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी म्हटले आहे.

बीड येथील शिवाजी चौकात या मोर्चासाठी मोठ्यासंख्येने मराठा समाज बांधव जमले होते. तसेच, यावेळी कडेकोट पोलीस बंदोस्त देखील तैनात करण्यात आलेला होता. मोर्चाप्रसंगी कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन झाल्याचे दिसून आले. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणार असल्याची सूचना विनायक मेटे यांनी अगोदरच दिली होती. त्यानंतर आज बीडमधून या मोर्चाला सुरूवात झाली.

मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर मराठा समजातील विविध नेत्यांकडून आक्रमक भूमिका घेतली जात आहे. हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलातून निघून, जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचणार होता. या अगोदरचे मोर्चे हे मूक मोर्चे होते, परंतु या मोर्चात मोठ्याप्रमाणावर घोषणाबाजी करण्यात आल्याचे दिसून आले.

मराठा समाजाचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर समाजातून प्रचंड संताप व्यक्त होत असल्याने तो रस्त्यावर येऊन उद्रेक होऊ नये यासाठीच राज्य सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या नावाखाली ३१ मे पर्यंत टाळेबंदी लागू केली आहे. त्यामुळे आता ५ जून रोजी कोणत्याही परिस्थितीत बीडमध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चा काढणार असल्याचे शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांनी मोर्चाची घोषणा करताना सांगितले होते.

लिंगायत, मुस्लीम, धनगर या समाजालाही बरोबर घेऊन सरकारच्या नाकर्तेपणाविरुद्ध हा मोर्चा असेल. मराठा समाजाला न्याय देता येत नसेल तर ठाकरे आणि चव्हाण यांनी सत्ता सोडावी, अशी टीकाही त्यांनी तेव्हा केली होती.