अखेर मुंबई महापालिकेने एकही कंपनी पात्र न ठरल्यामुळे रद्द केले ग्लोबल टेंडर


मुंबई: मुंबई महानगरपालिकेने कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी ग्लोबल टेंडर काढले होते. पण, या निविदा प्रक्रियेत भाग घेतलेल्या 9 कंपन्यांपैकी एकही कंपनी पात्र न ठरल्यामुळे हे टेंडर अखेर रद्द करण्यात आल्यामुळे महानगरपालिकेच्या लसीकरण मोहिमेला ब्रेक बसला आहे. दरम्यान, महापालिका नव्याने टेंडर प्रक्रिया करू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुंबईतील लसीकरणाचा वेग कोरोना प्रतिबंधक लसींच्या तुटवड्यामुळे मंदावला आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने ग्लोबल टेंडर काढले होते. पण या ग्लोबल टेंडरमधून एका पुरवठादाराने माघार घेतली होती. त्यामुळे नऊच कंपन्या या निविदा प्रक्रियेत होत्या. पण, या कंपन्या लसींचा पुरवठा करण्यासाठीच्या अटी आणि शर्तीमध्ये पात्र ठरल्या नसल्यामुळे अखेर ही ग्लोबल टेंडर प्रक्रिया रद्द झाली आहे. तसेच एकाही लस उत्पादक कंपनीने या निविदा प्रक्रियेत भाग घेतला नव्हता. त्यामुळेही महापालिकेला लस पुरवठ्याच्या अटी आणि शर्ती पूर्ण करणारी कंपनी मिळू शकली नाही. त्यामुळे मुंबईकरांना लवकरच लस मिळण्याची शक्यता मावळली असून आता केंद्र सरकारकडून येणाऱ्या लसींवरच मुंबई महानगरपालिकेची सर्व भिस्त असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

कोरोना प्रतिबंधक लसींचा मुंबईत अनेक ठिकाणी तुटवडा निर्माण झाल्यामुळे अनेक ठिकाणी लसीकरणाला ब्रेक लागला आहे. मुंबई महापालिकेने या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी कोरोना लसीकरणासाठी ग्लोबल टेंडर काढले होते. या टेंडरद्वारे 1 कोटी डोसची मागणी करण्यात आली होती. विशेष म्हणजे मुंबई महानगरपालिका ही कोरोना लसीकरणासाठी ग्लोबल टेंडर काढणारी देशातील पहिली महापालिका ठरली होती.