सीबीआयच्या नव्या संचालकांनी लागू केला अधिकाऱ्यांसाठी नवा ड्रेस कोड


नवी दिल्ली – ड्यूटीवर असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पेहराव/गणवेशाबाबत नवीन नियमावली केंद्रीय अन्वेषण विभागाचे (CBI) नवे संचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी तयार केली आहे. यामुळे आता सीबीआयच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ड्यूटीवर उपस्थित असताना, कार्यालयात येताना जीन्स,टी-शर्ट, स्पोर्ट्स शूज वापरण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्याचबरोबर महिला कर्मचाऱ्यांना देखील फक्त साडी आणि फॉर्मल शर्ट वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. सीबीआयचे संचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी सीबीआय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी फॉर्मल कपडे परिधान करुनच कार्यालयात यावे, असे आदेश दिले आहेत.

सीबीआय संचालक म्हणून सुबोधकुमार जयस्वाल यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आपल्या कामाला सुरुवात करत त्यांनी सुरुवातीलाच सीबीआय कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या गणवेशाच्या नियमावलीत महत्त्वाचे बदल करुन घेतले आहेत. सुबोधकुमार जयस्वाल यांच्या मंजुरीनंतर सहाय्यक संचालक अनूप टी मॅथ्यू यांनी हे परिपत्रक जारी केले आहे.

नियमावलीत सुबोधकुमार जयस्वाल यांनी बदल केल्यानंतर आता सीबीआय कार्यालयात येताना कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना फॉर्मल शर्ट-पँट आणि फॉर्मल शूज या गणवेशातच येणे बंधनकारक केल्यामुळे आता जीन्स, टी-शर्ट, स्पोर्टस शूज किंवा चप्पल घालून कार्यालयात येण्यावर निर्बंध घातले आहेत. तसेच पुरुष अधिकाऱ्यांना आपली दाढी वाढवता येणार नाही.

त्याचबरोबर सीबीआय कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांच्याही पेहरावात बदल केला आहे. महिला कर्मचारी आणि महिला अधिकारी यांना कार्यालयात येताना साडी किंवा फॉर्मल शर्ट परिधान करण्याचे आदेश दिले आहेत. येत्या काळात अनेक नियमांत सीबीआयचे नवे संचालक सुबोधकुमार जयस्वाल बदल करणार असल्याची देखील चर्चा सुरु आहे.