अखेर गोल्डमॅन दत्ता फुगेच्या मारेकऱ्याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या


पुणे : पिंपरी-चिंचवडमधील सोन्याचा शर्ट घातल्यामुळे चर्चेत आलेले गोल्डमॅन दत्ता फुगे यांची हत्या करणाऱ्या आरोपींपैकी एक असलेला प्रमोद उर्फ कक्का धौलपुरी याला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून 3 देशी पिस्तुल आणि 6 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी पेरॉलवर बाहेर आला होता, त्याने तेव्हापासून भोसरी परिसरात दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला.

अनेकांनी त्याच्याकडे पिस्तुल असल्याचेही बघितले होते. पण त्याच्या दहशतीमुळे कुणीच पोलिसांकडे तक्रार करत नव्हते. त्यातच एका सजग नागरिकाने कृष्ण प्रकाश यांना व्हॉट्सअॅपवर मसेज करून धौलपुरीया बद्दल माहिती दिली आणि त्याच्याकडे असलेल्या पिस्तुलबद्दलही सांगितले. तेव्हा कृष्ण प्रकाश यांनी तात्काळ आपले अधिकारी आणि कर्मचारी पाठवून मोठ्या शिताफीने धौलपुरीयाला अटक केली. पोलिसांनी केवळ व्हॉट्सअॅप आलेल्या एका मॅसेजवरुन केलेल्या या कामगिरीचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. तर शहरात कुठेही गैरप्रकार सुरू असतील तर थेट माझ्याशी संपर्क करा किंवा मॅसेज करून कळवा, असे आवाहन कृष्ण प्रकाश यांनी केलं आहे.

गोल्ड मॅन दत्ता फुगे हत्या प्रकरण कक्का धौलपुरीया अटक झाल्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. भोसरी परिसरातील रहिवासी असलेले दत्ता फुगे यांना सोने परिधान करण्याची प्रचंड हौस होती. फुगे यांनी याच हौसे पोटी तब्बल 3 किलो सोन्याचा शर्ट तयार करून घेतला होता, ज्यामुळे फुगे यांची गोल्डमॅन म्हणून जगभर ओळख निर्माण झाली होती.

पण याच खोट्या प्रतिष्ठेपायी फुगे यांचे अनके शत्रू तयार झाले. वक्रतुंड नावाने फुगे चिटफंडही चालवायचे. ज्यामध्ये त्यांनी अफरातफर केल्याचे आरोपही झाले होते आणि जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय असल्यामुळे फुगे अनेक आर्थिक व्यवहार वादात सापडले आणि अशाच एका आर्थिक व्यवहारातुन 15 जुलै 2016 ला दिघी परिसरातील भारतमाता नगर येथे धौलपुरीयायाने आपल्या इतर साथीदारांसह फुगेचा दगडाने ठेचून खून केला होता.

आता धौलपुरीयाला भोसरी पोलिसांनी अटक केली खरी, पण गोल्डमॅन फुगेच्या हत्ये प्रकरणी शिक्षा भोगूनही, तो सुधारला नाही आणि त्याने पुन्हा गुनेहगारी क्षेत्रात मुक्त संचार ठेवत घातक शस्त्रसाठा बाळगल्याची बाब ह्या निमित्ताने पुढे आल्याने धौलपुरीया सारख्या आरोपींना पोलीस आणि कायद्याची जरब का बसली नसेल असा प्रश्न निर्माण झाला आहे.