बायोलॉजिकल-ई कंपनीकडून सरकार खरेदी करणार 30 कोटी कोरोना लस


नवी दिल्ली – सध्या देशात कोरोना लसींचा मोठा तुटवडा जाणवत आहे. केंद्र सरकारने याच पार्श्वभूमीवर देशातील एका कंपनीसोबत मोठा करार केला आहे. हैदराबादमधील लस उत्पादक कंपनी बायोलॉजिकल-ईकडून मोदी सरकार कोरोना लसीचे 30 कोटी डोस खरेदी करणार आहे. या लसींचे उत्पादन ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान घेतले जाणार आहे. केंद्र सरकारने यासाठी कंपनीला 1500 कोटी रुपयांचे आगाऊ पेमेंटदेखील केले आहे.

पहिल्या आणि दुसऱ्या फेजच्या ट्रायलमध्ये पॉझिटिव्ह रिझल्ट आल्यानंतर बायोलॉजिकल-ई आता लसीच्या तिसऱ्या क्लिनिकल ट्रायल्सच्या तयारीत आहे. ही लस एक आरबीडी प्रोटीन सब-यूनिट व्हॅक्सीन असून विशेष म्हणजे, भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिननंतर ही दुसरी स्वदेशी लस आहे.

केंद्र सरकारला देशात जास्तीत-जास्त लसीकरण करण्यासाठी भरपूर लसींची गरज आहे. म्हणूनच केंद्र सरकार बायोलॉजिकल-ईला वेळोवेळी मदत करत आहे. या अंतर्गत सरकारने कंपनीला क्लिनिकल ट्रायलसाठी 100 कोटी रुपये दिले असून, इतर रिसर्चसाठी आणखी मदत पुरवणार आहे.