सुशांत सिंह राजपूतला ड्रग्ज पोहोचवणाऱ्या हरीश खानला एनसीबीने केली अटक


मुंबई : सुशांत सिंह राजपूत प्रकरणी तपास करत असलेल्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) हाती त्याच्यापर्यंत ड्रग्ज पोहोचवणारा ड्रग पेडलर लागला आहे. त्याचे नाव हरीश खान असे असून वांद्रेमधून त्याला एनसीबीने अटक केली आहे. हरीशसोबत त्याचा भाऊ शाकिब खानला सुद्धा अटक करण्यात आली आहे. 19 पेक्षा जास्त गुन्हे शाकिबवर दाखल आहेत. एनसीबीने शाकीबला वांद्रे पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.

28 मे रोजी सुशांत सिंह राजपूतचा रूम पार्टनर आणि जवळचा मित्र सिद्धार्थ पीठानीला मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने हैदराबादमधून अटक केली होती. नीरज आणि केशव जे सुशांतचे नोकर होते त्यांची सुद्धा एनसीबीने कसून चौकशी केली. या चौकशीनंतर हरीश खान याचे नाव समोर आले. हरीश खान तोच ड्रग पेडलर आहे, ज्याच्याकडून सुशांत सिंहपर्यंत ड्रग्ज पोहचवले जात होते.

वांद्रे परिसरात हरीश त्याचा भाऊ शकिब खान सोबत ड्रग्सचा व्यापार करत होता. हरीश खानला दाऊद बनायचे होते, दाऊद त्याचा प्रेरणास्त्रोत असून त्याला मुंबईवर दाऊदसारखे अधिराज्य गाजवायचं होते. हरीश खान आपली दहशत कायम ठेवण्यासाठी वांद्रे परिसरातील छोट्या ड्रग पेडलरच अपहरण करायचा आणि त्यांच्याकडे असलेले ड्रग्स जप्त करुन त्यांना आपल्या टोळीमध्ये काम करण्यास भाग पाडायचा. लोकांमध्ये आपली दहशत निर्माण करण्यासाठी हरीश खान कधी बंदूक घेऊन फिरायचा, तर कधी जिवंत साप घेऊन.

युद्धपातळीवर एनसीबीचा तपास सुरु असून लवकरच यात अजून मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. एनसीबीपासून वाचण्याचा प्रयत्न सिद्धार्थ पीठानी, नीरज, केशव करत होते. सिद्धार्थ पीठानीला तीन वेळा समन्स बजावून सुद्धा तो चौकशीसाठी हजर झाला नव्हता. त्यानंतर एनसीबीने सिद्धार्थवर पाळत ठेवून त्याला हैदराबादमधून अटक केली. सिद्धार्थच्या अटकेनंतर एनसीबीने नीरज आणि केशव या दोघांची चौकशी सुरू केली आणि या प्रकरणी नवे खुलासे होऊ लागले.