खासगी रुग्णालयाच्या पत्रानंतर नाशिक महापालिका आयुक्त अॅक्शन मोडमध्ये; रुग्णांची सेवा बंद केली तर कठोर कारवाई करू


नाशिक : नाशिक महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी खाजगी रुग्णालयातील डॉक्टर्सना कोरोना महामारीच्या काळात रुग्णांची सेवा बंद केली तर कठोर कारवाई करू, असा इशारा दिला आहे. कोरोनामुळे सुरु असलेल्या मृत्यूतांडवात रुग्णांचे प्राण वाचवणारे डॉक्टर्स हताश झाले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना नाशिकमधील 172 खासगी रुग्णालयांच्या प्रमुखांनी पत्र लिहून कोरोना उपचाराच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी केली होती. त्यानंतर खाजगी रुग्णालयातील डॉक्टरशी चर्चा करणार असून तोडगा निघाला, नाहीतर कारवाई करणार असल्याचा इशारा कैलास जाधव यांनी दिला.

याबाबत महापालिका आयुक्त कैलास जाधव म्हणाले की, हॉस्पिटल ऑनर्स असोसिएशनचा निर्णय ऐकतर्फी आणि चुकीचा असून महानगरपालिका सर्व हॉस्पिटलला परवाना देत असते. सेवा देणे हे प्रत्येक रुग्णालयाचे कर्तव्यच आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र देण्याअगोदर स्थानिक प्रशासनाशी चर्चा करणे अपेक्षित होते. पण त्या आधी कोणतीही चर्चा झाली नाही. आमच्याकडे समस्या न मांडता थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. आज खाजगी डॉक्टरशी चर्चा करणार तोडगा निघाला नाहीतर कारवाई करण्यात येईल.

आज नाशिकमधील 172 खाजगी रुग्णालयांच्या प्रमुखांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून त्यांनी आम्हाला कोरोना उपचाराच्या जबाबदारीतून मुक्त करा, अशी मागणी केली आहे. तसेच आम्ही मानसिक आणि शारिरीकदृष्ट्या थकलो असल्याचेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे सध्या कोरोनाचा आलेख उतरणीला लागला असून रुग्णसंख्या कमी होत असल्यामुळे सध्या खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना शायकीय रुग्णालयांत दाखल करण्यात यावे, अशी मागणीही या पत्रातून मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. अशातच राज्य सरकार यावर काय भूमिका घेते, हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.