गुजरात आणि मध्यप्रदेशमध्येही बारावीच्या परीक्षा रद्द


नवी दिल्ली : गुजरात आणि मध्यप्रदेशनेही सीबीएसई आणि आयएससीपाठोपाठ बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि पालकांना बोर्डाच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. दरम्यान राज्यातील बारावीच्या परीक्षा रद्द होण्याचे संकेत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत.

बारावीच्या परीक्षा रद्द केल्याचे गुजरातचे शिक्षणमंत्री भूपेंद्र सिंह यांनी जाहीर केले. त्यापाठोपाठ लगेचच मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी बारावीच्या परीक्षा रद्द केल्याची घोषणा केली आहे. या अगोदर हरियाणाने बारावीच्या परीक्षा रद्द केल्याची घोषणा केली होती. तसेच गोव्यात देखील बारावीची परीक्षा रद्द करण्याची शक्यता असून आज त्यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे.

बारावीच्या परीक्षा रद्द केल्याचा निर्णय गुजरात सरकारने आज जाहिर केला आहे. विशेष म्हणजे कालच त्यांनी बारावीचे वेळापत्रक जाहीर केले होते. त्यानुसार एक जुलैपासून परीक्षा सुरू होणार होत्या. उत्तर प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड या भाजपशासित सरकारांनीही बारावीची परीक्षा होणार म्हणून जाहीर केले होते. पण मोदींच्या कालच्या निर्णयानंतर सगळे तोंडावर पडले आहेत. सगळी राज्य सरकारे आता याबाबत भूमिका बदलत आहेत.

दरम्यान शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून राज्यातील बारावीच्या परीक्षा रद्द होण्याचे संकेत मिळत आहे. कोरोना परिस्थितीत परीक्षा घेणे शक्य नसल्याची मागणी केंद्राकडे केल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. बारावीच्या परीक्षा संदर्भात आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्यात येणार असून त्यानंतर विद्यार्थ्यांची मानसिकता लक्षात घेऊन लवकरात लवकर निर्णय घेण्यात येणार आहे.

बारावीची परीक्षा रद्द करण्यासंदर्भात आपत्ती व व्यवस्थापन विभागाकडे शालेय शिक्षण विभागाचा प्रस्ताव पाठवला जाणार आहे. त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे.