जगभरातील पहिलेच प्रकरण : चीनमधील एका व्यक्तीला H10N3 बर्ड फ्लूची लागण


बीजिंग : संपूर्ण जग अद्यापही चीनमधून उदयास आलेल्या कोरोना महामारीचा सामना करत आहे. त्यातच आता चिंता वाढवणारी आणखी एक बातमी चीनमधून समोर आली आहे. चीनमध्ये बर्ड फ्लूच्या H10N3 स्ट्रेनमुळे मानवी संसर्गाची पहिली घटना समोर आली आहे. यावृत्ताची नॅशलन हेल्थ कमिशनने याची पुष्टी केली.

झेनजियांग शहरातील संक्रमित 41 वर्षीय व्यक्ती रहिवाशी आहे. या रूग्णात 28 मे रोजी एव्हियन इन्फ्लूएंझा विषाणूचा H10N3 स्ट्रेन आढळला आहे. पण रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे आणि लवकरच या रुग्णाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येईल. सध्या आरोग्य अधिकाऱ्यांनी संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध सुरू केला आहे.

मानवामध्ये पोल्ट्रीमधून विषाणूचे संक्रमण होण्याची ही तुरळक घटना आहे आणि यातून साथीचा रोग होण्याचा धोका अत्यंत कमी आहे. नॅशनल हेल्थ कमिशनने, या व्यक्तीला H10N3 या स्ट्रेनची लागण कशी याची माहिती दिली नाही. बर्ड फ्लू एक व्हायरल इन्फेक्शन आहे, ज्यास एव्हियन इन्फ्लूएन्झा देखील म्हणतात आणि बऱ्याच प्रकारचे स्ट्रेन यामध्ये असतात. राष्ट्रीय आरोग्य आयोगाने एका निवेदनात म्हटले की, यापूर्वी जगभरात H10N3 स्ट्रेनमधून मानवी संसर्गाची कोणतीही घटना नोंदली गेली नव्हती.

H10N3 कमी संसर्गजन्य आहे किंवा पोल्ट्रीमध्ये आढळणारा स्ट्रेन तुलनेने कमी गंभीर आहे. त्यामुळेचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर होण्याचा धोका कमी आहे. चीनमध्ये एव्हियन इन्फ्लूएन्झाचे अनेक प्रकार आहेत आणि अधूनमधून लोकांना याची लागण होते. विशेषत: पोल्ट्री फार्म चालवणाऱ्या लोकांना याची लागण होते.

जवळजवळ 300 लोकांचा मृत्यू 2016-17 दरम्यान H7N9 स्ट्रेनमुळे झाला होता. त्यानंतर बर्ड फ्लूमुळे मानवी संक्रमणाची कोणतीही लक्षणीय संख्या आढळली नाही. बर्ड फ्लू हा इन्फ्लूएन्झा टाईप ए विषाणूमुळे पसरणारा एक आजार आहे. सामान्यत: हा विषाणू चिकन, कबूतर आणि इतर पक्ष्यांमध्ये आढळतो. H5N1, H7N3, H7N7, H7N9 आणि H9N2 सारख्या इन्फ्लूएंझा विषाणूचे बरेच प्रकार आहेत. त्यापैकी काही सौम्य आहेत तर काही अधिक भयंकर आहेत.