दरभंगा : सायकल गर्ल या नावाने प्रसिद्ध असलेल्या बिहारच्या ज्योती पासवानवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सोमवारी (31 मे ) हृदयविकाराच्या झटक्याने ज्योतीच्या वडिलांचे निधन झाले. तिच्या वडिलांच्या निधनाच्या वृत्ताला ज्योतीच्या कुटुंबियांनी दुजोरा दिला आहे.
‘सायकल गर्ल’ ज्योती पासवानच्या वडिलांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार ज्योती पासवानच्या वडिलांच्या चुलत्याचे निधन झाले होते. सोमवारी ते गावकऱ्यांसोबत चुलत्याच्या श्राद्धाविषयी चर्चा करत होते. चर्चा संपल्यानंतर मोहन पासवान बैठकीतून उठले आणि अचानक खाली पडले. त्यावेळी त्यांचा मृत्यू झाला. ज्योतीच्या कुटुंबियांनी तिच्या वडिलांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
कोरोनाच्या भीतीमुळे अनेकांनी गेल्या वर्षी लॉकडाऊन दरम्यान शहरातून गावाकडे पलायन केले होते. त्यात ज्योतीचा देखील समावेश होता. त्यावेळी वडिल मोहन पासवान यांना सायकलवर बसवून अवघ्या 13 वर्षाच्या ज्योतीने गुडगाव ते दरभंगा असा आठ दिवसाचा प्रवास करत घरी आणले होते. 13 दिवसात सायकलवर तब्बल 1300 किमीचा प्रवास पूर्ण करणाऱ्या ज्योतीचे खूप कौतुक झाले. ज्योतीचे अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील कौतुक केले होते.
दिल्लीमध्ये ज्योतीचे वडील मोहन पासवान हे ऑटो चालवून आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करत होते. जानेवारी 2020 मध्ये त्यांचा अपघात झाला. तेव्हा ज्योती त्यांची देखभाल करण्यासाठी वडिलांकडे आली होती. यादरम्यान, कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरू झाला. रोजगार बंद झाल्यामुळे खाण्यापिण्याची मोठी समस्या निर्माण झाली. तेव्हा केवळ 500 रुपयांना एक सायकल खरेदी करून ज्योतीने तिच्या वडिलांना सायकलवर दरभंगा येथे आणले होते.