केंद्र सरकारची ‘लिली’च्या अँटिबॉडी कॉकटेल इंजेक्शनला मान्यता


नवी दिल्ली – भारताला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोरदार तडाखा बसलेला असतानाच हा लढा लसींच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे अधिकाधिक कठीण होत चालला आहे. या पार्श्वभूमीवर रॉश इंडियाच्या कॉकटेल अँटिबॉडी इंजेक्शनला काही दिवसांपूर्वी आपातकालीन वापरासाठी मान्यता दिल्यानंतर आता भारतात अजून एका कॉकटेल अँटिबॉडी इंजेक्शनला मान्यता देण्यात आली आहे.

भारतातील मध्यम आणि सामान्य तीव्रतेच्या कोरोना रुग्णांसाठी अमेरिकन औषध निर्माता कंपनी असलेल्या एलि लिली अँड कंपनीच्या अँटिबॉडी कॉकटेल इंजेक्शनचा वापर करण्याला केंद्र सरकारची मान्यता मिळाली आहे. त्यामुळे कोरोनाशी सुरू असलेल्या भारताच्या लढ्यामध्ये अजून एक औषध आरोग्य यंत्रणेच्या मदतीसाठी आले आहे.

अद्याप कोणतेही औषध शरीरात प्रवेश केलेल्या कोरोनाचा खात्मा करण्यासाठी बनवण्यात आलेले नाही. पण, कोरोनाचा सामना करणाऱ्या शरीरात अँटिबॉडी तयार करण्याची प्रक्रिया सुरू किंवा वेगवान करण्यासाठी काही औषधांचा वापर केला जात आहे. रॉश इंडियाच्या कॉकटेल अँटिबॉडीजप्रमाणेच लिली कंपनीच्या कॉकटेल अँटिबॉडीजमुळे देखील काहीसा असाच परिणाम साधला जाणार आहे.

यासंदर्भात रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, बॅमलॅनिविमॅब आणि इटेसेविमॅब या दोन प्रकारच्या अँटिबॉडी इंजेक्शनचे मिश्रण करून लिली कंपनीच्या मोनोक्लोनल अँटिबॉडी इंजेक्शनचा डोस तयार करण्यात आला आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी या प्रकारच्या मोनोक्लोनल अँटिबॉडीज शरीरात नैसर्गिकरीत्या तयार होणाऱ्या अँटिबॉडीजची नक्कल तयार करतात. त्यामुळे शरीराला कोरोनाचा सामना करण्यासाठी मदत मिळू शकते.

दरम्यान, लिली कंपनीकडून जाहीर करण्यात आल्याप्रमाणे कोरोनाचा सामना करण्यासाठी अधिकाधिक रुग्णांना उपचार मिळावेत, यासाठी हे इंजेक्शन मोफत पुरवता येतील का, याची चाचपणी सुरू आहे. त्यासंदर्भात केंद्र सरकारसोबत कंपनीकडून बोलणी सुरू असल्याचे देखील सांगण्यात आले आहे.

ही दोन्ही अँटिबॉडी असलेली इंजेक्शन्स रॉश इंडिया या औषध निर्मिती कंपनीने बनवली आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कोरोना उपचारांसाठी गेल्या वर्षी ही पद्धत वापरण्यात आली होती. कंपनीकडून जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार, दोन्ही इंजेक्शनच्या कॉकटेल पॅकिंगमध्ये कासिरिविमॅब (Casirivimab) आणि इमडेविमॅब (Imdevimab) यांचे प्रत्येकी ६०० मिलीग्रॅमचे डोस आहेत. या प्रत्येक डोसची किंमत ५९ हजार ७५० रुपये एवढी आहे. या एका कॉकटेल पॅकिंगमधून दोन रुग्णांना डोस देता येऊ शकतील. एका कॉकटेल पॅकिंगची कमाल किंमत १ लाख १९ हजार ५०० एवढी आहे.

दरम्यान, याविषयी बोलताना आयसीएमआरचे माजी प्रमुख वैज्ञानिक सल्लागार डॉ. रमण गंगाखेडकर यांनी सांगितले की, सिद्धांतानुसार मोनोक्लोनल अँटीबॉडी कॉकटेलमुळे विषाणूचे म्यूटेशन होण्याची शक्यता नाही. एखाद्या व्यक्तीस विषाणूऐवजी अँटीबॉडी कॉकटेलमुळे मध्यम ते गंभीर आजार होण्याची शक्यता असते. अँटीबॉडी कॉकटेलमुळे विषाणूची पुनरावृत्ती होण्यापासून टाळता येते.

अँटीबॉडी कॉकटेलचा तर्कसंगत उपयोग अत्यावश्यक आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर तीन-दहा दिवसांच्या आत अँटीबॉडी कॉकटेलचा वापर करावा, असे डॉ. रमण गंगाखेडकर यांनी सांगितले. मोनोक्लोनल अँटीबॉडी कॉकटेल उपचारामुळे कोरोनाच्या नविन व्हेरियंट्स पासून संरक्षण होऊ शकते, असे कोणतेही पुरावे उपलब्ध नसल्याचेही ते म्हणाले.