१७ सप्टेंबरपासून खेळवला जाणार आयपीएलचा दुसरा टप्पा


नवी दिल्ली – आता यूएईमध्ये कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आलेला आयपीएलचा १४वा हंगाम पूर्ण होईल. कोरोनाच्या बायो बबलमध्ये प्रवेशानंतर २९ व्या सामन्यांनंतरच स्पर्धा स्थगित करण्यात आली होती. नुकतीच बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण सभेत उर्वरित ३१ सामने यूएईमध्ये खेळवण्याची घोषणा करण्यात आली. पण तारखेसंदर्भात कोणताही निर्णय झालेला नव्हता. पण माध्यमांच्या वृत्तानुसार, १७ सप्टेंबरपासून आयपीएल २०२१चा दुसरा टप्पा खेळवण्यात येईल आणि अंतिम सामना १० ऑक्टोबरला खेळला जाईल.

यासंदर्भात इनसाइड स्पोर्टने दिलेल्या वृत्तानुसार, कॅरेबियन प्रीमियर लीगमुळे (सीपीएल २०२१) आयपीएलचे वेळापत्रक बीसीसीआयने जाहीर केले नाही. २८ ऑगस्ट ते १९ सप्टेंबर दरम्यान सीपीएल खेळवला जाणार आहे. या कारणास्तव, ही लीग ७ ते १० दिवस अगोदर आयोजित करण्यासाठी वेस्ट इंडीज बोर्डाशी चर्चा केली जात आहे, जेणेकरून त्या लीगमध्ये खेळणारे आयपीएलचे खेळाडू यूएईत पोहोचू शकतील.

एका वृत्तानुसार, येत्या १० दिवसात आयपीएलचे वेळापत्रक बीसीसीआय जाहीर करेल. अजूनही इंग्लिश खेळाडूंशी त्यांच्या आयपीएलमध्ये खेळण्याविषयी बीसीसीआय चर्चा करत आहे. पण इंग्लंड बोर्डाने आधीच सांगितले आहे, की ते आपल्या खेळाडूंना आयपीएलसाठी सोडणार नाही.

याचदरम्यान, कोलकाता नाईट रायडर्सला (केकेआर) मोठा झटका बसला आहे. आयपीएलच्या उर्वरित हंगामात न खेळण्याचे संघाचा स्टार खेळाडू आणि वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने म्हटले आहे. कोलकाता संघाला सध्याच्या मोसमात चांगली कामगिरी करता आली नसल्यामुळे हा संघाला दुहेरी धक्का मानला जाऊ शकतो. केकेआरने यंदा ७ पैकी केवळ २ सामने जिंकले आहेत. कोलकाता पॉइंट टेबलमध्ये सातव्या क्रमांकावर आहे.