गंगेतील मृतदेहांवरून माध्यमांकडून होत असलेल्या वार्तांकनावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केली टीका


नवी दिल्ली – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधितांच्या संख्येचा झालेला विस्फोट आणि त्यासोबतच मृतांच्या संख्येतही भयावह वाढ झाल्याचे दिसून आले. देशात उद्रेकाच्या काळात दिवसाला सरासरी साडेतीन ते चार हजार मृत्यूंची नोंद होत होती. बिहार आणि उत्तर प्रदेशातून वाहणाऱ्या गंगेच्या पात्रात याच काळात अचानक मृतदेह तरंगताना दिसू लागले. याकडे सरकारचे लक्ष्य माध्यमांनी वेधल्यानंतर राजकारण प्रचंड तापले होते. मोदी आणि योगी सरकारवर त्यावरून विरोधकांच्या टीकेचे धनीही ठरले. पण, याच मुद्द्यावर भूमिका मांडताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने माध्यमांवर आरोप केला आहे.

उत्तर प्रदेशात बलिया, गाझियाबाद यासह गंगेच्या काठावर असलेल्या विविध घाटांच्या ठिकाणी मृतदेह वाहून येत असल्याचे निदर्शनास आले होते. मोदी सरकार आणि उत्तर प्रदेशातील सरकारवर यावरून टीका झाली. त्यानंतर प्रशासनाने हे मृतदेह बाहेर काढण्याचे आणि नदीत मृतदेह टाकले जाणार नाही, यासाठी खबरदारी घेण्यास सुरूवात केली.

दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहप्रचारप्रमुख नरेंद्र कुमार यांनी गंगेत सापडलेल्या मृतदेहावरून वेगळी भूमिका मांडली आहे. गंगेत आढळून आलेल्या मृतदेहांचे प्रसारमाध्यमांनी केलेले वार्तांकन हा अजेंड्याचाच भाग असल्याचा आरोप त्यांनी केला. महर्षी नारद जयंतीनिमित्त व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नरेंद्र कुमार या कार्यक्रमात बोलताना म्हणाले, २०१५ आणि २०१७ सालीही गंगेमध्ये मृतदेह आढळून आले होते. त्यावेळी तर कोरोनाची महामारी नव्हती. त्यामुळे आता आढळून येणाऱ्या मृतदेहांचा संबंध कोरोनाशी जोडणे हा अजेंड्याचाच भाग असल्याचे स्पष्ट दिसत आहे, असे नरेंद्र कुमार यांनी म्हटले आहे.

महामारीच्या काळात आणि एरवी माध्यमांनी आपले काम चांगल्या पद्धतीने केले आहे. यंत्रणेतील दोष दाखवून देणे ठिक आहे, पण हे सगळे योग्य वेळी आणि काळजीपूर्वक करायला हवे. लोकांमध्ये त्याद्वारे भीती निर्माण न होता जनजागृती व्हायला हवी, असे नरेंद्र कुमार यांनी म्हटले आहे. नारद मुनी हे जगातील पहिले पत्रकार असल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मानते. त्यामुळे त्यांची जयंती दरवर्षी संघाकडून साजरी केली जाते. यानिमित्ताने उल्लेखनीय काम करणाऱ्या पत्रकाराने पुरस्कारही दिले जातात.