आयआयटी हैदराबादकडून म्युकरमायकोसिस उपचारांसाठी ओरल सॉल्यूशनची निर्मिती


हैदराबाद : सध्या देशभरात कोरोनासोबतच म्युकरमायकोसिस अर्थात ब्लॅक फंगसचाही कहर सुरु आहे. कोरोनाच्या या महामारीदरम्यान या आजाराने आतापर्यंत अनेकांचे जीव घेतले आहेत. यावरील इलाज अतिशय महाग आहे. त्याचबरोबर याच्यावरील उपचारांसाठी लागणारे इंजेक्शनही सहजरित्या उपलब्ध होत नाही.

आयआयटी हैदराबादमधून याचदरम्यान एक चांगली बातमी समोर आली आहे. ब्लॅक फंगसच्या इलाजासाठी प्रभावी ठरणारे एक सॉल्यूशन आयआयटी हैदराबादमधील संशोधकांनी तयार केले आहे. रुग्णांना हे सॉल्यूशन तोंडाद्वारे दिले जाईल आणि याचे टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. या रुग्णांना सध्या केवळ इंजेक्शन दिले जाते.

दोन वर्षांच्या संशोधनानंतर संशोधकांचा या सॉल्यूशनवर आता पूर्ण विश्वास आहे. त्यांच्यामते या सॉल्यूशनचे मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जाऊ शकते. या सॉल्यूशनचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे औषध परवडणारे आहे. केवळ 200 रुपये 60 मिलीग्रामच्या या गोळीची किंमत आहे. 60 मिलीग्रामचे औषध रुग्णासाठी अनुकूल असते, असे संशोधकांचे म्हणणे आहे.

मागील दोन वर्षांपासून आयआयटी हैदराबादमध्ये केमिकल इंजिनीअरिंग डिपार्टमेंटचे प्रोफेसर सप्तऋषी मजुमदार, डॉ. चंद्र शेखर शर्मा आणि त्यांच्या पीएचडी स्कॉलर मृणालिनी गेधाने आणि अनंदिता लाहा हे कालाजारसाठी प्रभावी ठरणाऱ्या नॅनोफायब्रस AMB औषधावर काम करत होते.

मोठ्या प्रमाणात हे औषध उत्पादित करण्यासाठी योग्य फार्मा कंपन्यांकडे दिले जाऊ शकते याबाबत येथील संशोधक दोन वर्षांच्या संशोधनानंतर आश्वस्त असल्याचेही आयआयटी हैदराबादकडून सांगण्यात आले आहे.

सध्या देशात ब्लॅक आणि इतर प्रकारच्या बुरशीच्या उपचारांसाठी इतर औषधांचा वापर केला जात आहे. त्यामुळे आम्ही बनवलेल्या औषधाची उपलब्धता आणि परवडणारे दर पाहता त्याच्या आत्पकालीन वापराची आणि तात्काळ परीक्षणाची परवानगी द्यावी, असेही संस्थेतर्फे सांगण्यात आले.

बौद्धिक संपदा अधिकारापासून ही टेक्नॉलॉजी मुक्त आहे. जेणेकरुन याचे व्यापक स्तरावर उत्पादन व्हावे आणि नागरिकांना ते परवडेल आणि सहजरित्या उपलब्ध होईल, असे डॉ. चंद्रशेखर शर्मा यांनी म्हटले.