पायरेटेड सीडी बाळगल्याप्रकरणी किम जोंगच्या फायरिंग स्वॉडने नातेवाईकांसमोरच केली त्याच्या शरीराची चाळण


प्योंगप्यांग – जगातील सर्वाधिक विचित्र नियमांमुळे उत्तर कोरिया हा देश कायमच चर्चेत असतो. या देशामधील अनेक गोष्टी आणि बातम्या खूप क्वचितच जगासमोर येतात. पण या देशातील समोर आलेल्या बातम्याही अनेकदा धक्कादायक आणि गोंधळवून टाकणाऱ्या असतात. जागतिक स्तरावर या देशामधील कोणती माहिती पाठवावी आणि कोणती नाही याचे सर्व हक्क सरकार आणि सरकारी अधिकाऱ्यांकडे आहेत. त्यातच या देशातील कायदाही अगदी विचित्र आहे. या देशाने नुकताच पायरेटेड साहित्य आणि प्रसारमाध्यमां संदर्भातील एका कायद्यामध्ये बदल केला. विशेष म्हणजे या कायद्यामध्ये बदल केल्यानंतर एका व्यक्तीला दोषी ठरवून त्याला मृत्यूदंडाची शिक्षाही देण्यात आली आहे.

बदल करण्यात आलेल्या कायद्यानुसार सर्वांसमोर गोळ्या घालून दोषी आढळलेल्या व्यक्तीला ठार करण्यात येते. एका व्यक्तीला नवीन कायदा अंमलात आणल्यानंतर पायरेटेड सीडी विकताना रंगेहाथ पकडण्यात आले. या व्यक्तीला पायरसीच्या गुन्ह्याखाली मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. सीडी रोम मेमरी स्टिक्स या व्यक्तीकडे आढळून आल्या होत्या. यामध्ये शत्रू राष्ट्र समजल्या जाणाऱ्या दक्षिण कोरियामधील चित्रपट, गाणी आणि म्युझिक व्हिडीओ होते. या व्यक्तीवरील गुन्हे सिद्ध झाल्यानंतर त्याला मृतदंडाची शिक्षा देण्यात आली. हुकुमशाह किम जोंग उन यांच्याच सरकारने तयार केलेल्या नव्या नियमांनुसार ही शिक्षा देण्यात आली.

मरण पावलेल्या या व्यक्तीचे नाव ली असल्याची माहिती समोर आली आहे. देशद्रोह आणि सामाजिक घटकांविरोधात वागणूक केल्याचा आरोप नवीन कायद्यानुसार या व्यक्तीवर ठेवण्यात आला. दक्षिण कोरियामधील चित्रपट, गाणी आणि टीव्ही शोच्या व्हिडीओंचा समावेश असणारी सीडी लीकडे सापडली होती. ली याला गोळ्या घालण्याआधी ५०० सर्वसामान्य नागरिकांना त्याचा मृत्यू पाहण्यासाठी बोलवण्यात आले. लीच्या नातेवाईकांचाही यामध्ये समावेश असल्याचे डेलीस्टार या इंग्लंडमधील वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

लीच्या शरीरावर १२ जणांच्या फायरिंग स्वाडने गोळ्या झाडल्या. हे सर्व दृष्य समोर पाहणाऱ्या लीच्या नातेवाईकांना रडण्याचीही परवानगी नव्हती. लीचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह ट्रकमध्ये टाकून राजकीय कैदी असणाऱ्या कॅम्पमध्ये नेण्यात आला. लीचे नातेवाईक रडताना दिसले असते, तर त्यांच्याविरोधातही देशद्रोही व्यक्तीबद्दल सहानुभूती दाखवल्याचा आरोप ठेवण्यात आला असता.

डिसेंबर २०२० पासून उत्तर कोरियातील कायद्यांमध्ये बदल करण्यात आला असून कायदे कठोर करण्यात आले आहेत. दक्षिण कोरियामधील चित्रपट, टीव्ही शो पाहणे येथे कायद्याने गुन्हा आहे. असे करताना कोणी आढळून आल्यास त्याला मृत्यूदंड किंवा जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात येते. एखादी व्यक्ती असे कृत्य करत असल्याची माहिती मिळाल्यानंतरही ती यंत्रणांना न देणाऱ्या व्यक्तीला सात वर्षे तुरुंगवासाची शिक्षा केली जाऊ शकते. नव्या नियमांमुळे उत्तर कोरियामधील जनतेमध्ये भीतीचे वातावरण आहे.