उत्तर प्रदेशमधील ‘या’ जिल्ह्यात लसीकरण केलेल्यांनाच मिळणार दारु


लखनौ – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील नागरिक चिंतेत आहेत. त्यातच आता कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची शक्यता देखील तज्ञांनी वर्तवली आहे. त्यामुळे देशात लसीकरण मोहिमेला वेग आला आहे. पण लसीकरणाकडे बरेच लोक दुर्लक्ष करत आहेत. यावर उपाय म्हणून एक अजब नियम उत्तर प्रदेशातील अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी बनवला आहे. या नियमामुळे उत्तर प्रदेशमधील इटावा जिल्ह्यातील सैफईमधील प्रत्येक दारूच्या दुकानासमोर एकच चर्चा सुरू आहे.

लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र नसेल, तर या शहरात दारू मिळणार नाही, अशी नोटीस लावण्यात आली आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी हेम कुमार सिंह यांच्या निर्देशानुसार ही नोटीस लावण्यात आली आहे. सध्या सोशल मीडियावर या अजब आदेशाची जोरदार चर्चा सुरू आहे.


अलीगढ़मध्ये विषारी दारूच्या सेवनामुळे झालेल्या अनेक मृत्यूनंतर हेम कुमार सिंग यांनी ही सूचना दिली आहे. हेम कुमार सिंह यांनी अलीगड विषारी दारू घोटाळ्यानंतर जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांसह सैफई येथील दारू दुकानांची तपासणी केली. दरम्यान, हेम कुमार सिंग यांनी दारू विक्रेत्यांना ‘लस नाही तर दारू नाही’ अशी नोटीस लावण्याच्या स्पष्टपणे सूचना दिल्या आहेत. या महिन्याच्या सुरूवातीला अलिगडमध्ये विषारी दारू पिऊन कमीतकमी २५ जणांचा मृत्यू झाला होता.

याची पुष्टी सैफई येथील मद्य दुकानांच्या कर्मचाऱ्यांनीही केली. ते म्हणाले की, अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितले आहे की, असे केल्यामुळे जास्तीत जास्त लोक लस घेतील. पण इटावा जिल्हा उत्पादन शुल्क अधिकारी कमल कुमार शुक्ला म्हणाले की, ज्यांना अद्याप दारू मिळालेली नाही, त्यांना दारू विक्री करण्यापासून थांबविण्याचे कोणतेही आदेश देण्यात आले नाहीत. पण, लसीकरणाला चालना देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांना प्रोत्साहन मिळायला हवे, परंतु दारू खरेदीला लस प्रमाणपत्र देण्याचे आदेश नाहीत.