उद्यापासून सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत पुणे शहरातील सर्व दुकाने राहणार सुरू !


पुणे – राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्याचे चित्र दिसत असले तरी देखील, अद्यापही कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत दररोज भर पडतच आहे. त्याचबरोबर काही जिल्ह्यांमध्ये संसर्गाचे प्रमाण अद्यापही कमी झालेले नाही. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी काल राज्यातील लॉकडाऊनचे निर्बंध १५ जूनपर्यंत कायम ठेवण्याची घोषणा केली.

त्यांनी यावेळी रुग्णसंख्या कमी असलेल्या ठिकाणी निर्बंध शिथिल करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार कोरोनाबाधितांची संख्या कमी संख्या असलेली शहरे आणि जिल्ह्य़ांमध्ये अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत खुली राहू शकणार आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आज पत्रकार परिषद घेत, शहरातील नव्या निर्बंधांबाबत माहिती दिली.

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील सर्व दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सोमवारी ते शुक्रवारी सुरू राहतील. तर, शनिवारी आणि रविवारी केवळ अत्यावश्यक सेवांमधील दुकाने सुरू राहणार आहेत. त्याचबरोबर शहरातील उद्याने, व्यायामशाळा (जिम), हॉटेल बंद राहणार असून, पार्सल सेवा सुरू राहणार आहे.

हा आदेश पुढील दहा दिवसांसाठी असणार आहे. आता २ वाजेपर्यंत नागरिकांच्या दृष्टीने सर्व सेवा सुरू राहणार आहेत. पण त्यानंतर नागरिकांनी बाहेर पडू नये. पीएमपीएमएल बस सेवा अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांसाठी सुरू राहणार आहे, इतर नागरिकांना त्याद्वारे प्रवास करता येणार नाही, अशी देखील माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

१५ जून रोजी सकाळी ७ वाजेपर्यंतचे या संदर्भातील सुधारित आदेश पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी परिपत्रकाद्वारे निर्गमित केले आहे.

  • त्यानुसार सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवामधील नमूद दुकाने ही आठवड्यातील सर्व दिवस सुरू राहतील.
  • पुणे मनपा क्षेत्रातील सर्व बँका कामाचे सर्व दिवस सुरू राहतील.
  • पुणे मनपा क्षेत्रातील अत्यावश्यक दुकानांव्यतिरिक्त इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी २ वाजपेर्यंत सुरू राहणार आहेत. रेस्टॉरंट व बार हे केवळ पार्सल व घरपोच सेवेसाठी सुरू राहतील.
  • ई-कॉमर्स मार्फत अत्यावश्यक वस्तू व सेवा तसेच अत्यावश्यक व्यतिरिक्त वस्तू यांची घरपोच सेवा सुरू करण्यास मूभा राहील.
  • दुपारी ३ वाजेनंतर वैद्यकीय सेवा व इतर अत्यावश्यक कारण, अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांना घराबाहेर पडण्यास संपूर्णत: प्रतिबंध राहील.
  • सर्व शासकीय कार्यालये २५ टक्के अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू राहतील.
  • आठवड्यातील सर्व दिवस मद्य विक्रीची दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजपेर्यंत सुरू राहतील.