कोरोना नियमांची पायमल्ली केल्याप्रकरणी भाजप आमदार महेश लांडगे यांच्यासह ६० जणांविरूद्ध गुन्हा दाखल!


पुणे – कोरोना नियमावलीचे पिंपरी-चिंचवडमधील भाजपा आमदार महेश लांडगे यांनी उल्लंघन केल्याचे आज माध्यमांद्वारे समोर आल्यानंतर, याप्रकरणी पोलीस आता काय कारवाई करतील? नियम फक्त सर्वसामान्यांनाच लागू आहेत का? नेते मंडळींना सर्व काही माफ आहे का? असे विविध प्रश्न सर्वसामान्य जनतेत चर्चिले जात होते. अखेर पोलीस प्रशासनाकडून सर्वसामान्यांच्या या प्रश्नाला करण्यात आलेल्या कारवाईवरून उत्तर मिळाले आहे. कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजप आमदार महेश लांडगे यांच्यासह ६० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भोसरी पोलीस ठाण्यात आमदार महेश लांडगे यांच्यासह एकूण ६० जणांवर कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी १८८, २६९ व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३) सह १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये जमावबंदीचे उल्लंघन प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

६ जून रोजी आमदार महेश लांडगे यांच्या मुलीचा विवाह सोहळा असून, त्यापूर्वी काल (रविवारी) झालेल्या मांडव सोहळ्यात त्यांनी कार्यकर्त्यांसह भंडारा उधळून डान्स केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. तसेच, यावेळी उपस्थित असलेल्या अनेकांनी मास्क देखील लावला नव्हता. कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेल्या व्यक्तींनी सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाकडे दुर्लक्ष करत, गर्दी करत जल्लोष केला. तसेच, यावेळी वाजंत्री, बैल जोड्यांचे देखील आयोजन करण्यात आले होते.