आपले हसू होऊ नये यासाठी चंद्रकांत पाटलांनी वक्तव्ये टाळावीत, हसन मुश्रीफांचा सल्ला


कोल्हापूर- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटलांना फार मस्ती आली आहे अशा शब्दांत संताप व्यक्त केला आहे. भाजपवर टीका करताना अजित पवार यांनी तोंड सांभाळून बोलावे, नाहीतर आम्ही फाटक्या तोंडाचे आहोत. आम्ही बोलायला लागलो तर तुम्हाला महागात पडेल, असा इशारा चंद्रकांत पाटलांनी दिला आहे. हसन मुश्रीफ यांनी त्यावर प्रतिक्रिया देताना आपले हसू होऊ नये यासाठी चंद्रकांत पाटलांनी अशी वक्तव्ये टाळावीत, असा सल्ला दिला आहे. ते कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

त्यांनी पंढरपूर-मंगळवेढा निकालाच्या वेळी ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांना तुम्ही जामीनावर सुटला आहात, पश्चिम बंगालच्या निकालावर बोलू नका, अशी तंबी दिली होती. परवा पण अशोक चव्हाण यांना तुमची औकात काय, अशी तंबी दिली होती. अशी तंबी देणे त्यांना शोभत नाही. त्यांचे सध्या एक कार्टून आले आहे ज्यामध्ये ते बेडवरुन पडले आहेत आणि झोपेत सरकार पडल्याचे म्हणत आहेत. आपले हसू होऊ नये यासाठी चंद्रकांत पाटलांनी अशी वक्तव्य टाळावीत, असा सल्ला हसन मुश्रीफ यांनी दिला आहे.

भाजपवर टीका करताना अजित पवार यांनी तोंड सांभाळून बोलावे, नाहीतर आम्ही फाटक्या तोंडाचे आहोत. आम्ही बोलायला लागलो तर तुम्हाला महागात पडेल. झोपेत असताना सरकार कसे आणायचे, हे अजित पवार यांना चांगलेच ठाऊक आहे. तुम्ही शरद पवार झोपेत असताना सरकार स्थापन करुन मोकळे झाला होतात. मात्र, अजित पवार यांना आपण काल काय केले होते, ही गोष्ट लक्षात राहत नसल्याचा टोला चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांना लगावला आहे.