कोव्हिशिल्डचे एवढे कोटी डोस जून महिन्यात उपलब्ध होतील; सीरमचे केंद्राला पत्र


पुणे – देशात कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा जाणवत असल्यामुळे लसीकरण मोहीम काहीशी मंदावली आहे. त्यामुळे केंद्रातील मोदी सरकारवर विरोधकांनी निशाणा साधला आहे. यासाठी कोरोना लसींची अतिरिक्त माहिती केंद्र सरकारकडून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिली जात आहे. १२ कोटी लस येत्या जून महिन्यात उपलब्ध असतील, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले आहे. आता केंद्र सरकारला जून १० कोटी लस देणार असल्याचे पत्र गृहमंत्री अमित शाह यांना सीरम इन्स्टिट्युटने दिले आहे.

तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो की, आम्ही जून महिन्यात १० कोटी कोव्हिशिल्ड व्हॅक्सिनची निर्मिती करत पुरवठा करणार आहोत. मे महिन्यात ६.५ कोटी डोसची निर्मिती केली होती आणि पुरवठा केला होता. देशातील मागणी पाहता आम्ही लसींचे उत्पादन वाढवले आहे. सीरम इन्स्टिट्युट देशातील नागरिकांची काळजी घेण्यास कटीबद्ध आहे. आमची संपूर्ण टीम सरकारच्या खांद्याला खांदा लावून कोरोनाविरुद्ध लढण्यास मैदानात उतरली असल्याचे कंपनीच्या नियामक विभागाचे संचालक प्रकाश कुमार सिंह यांनी दिलेल्या पत्रात सांगितले.

विधायक कामासाठी आम्हाला केंद्र सरकारकडून पूर्ण पाठिंबा मिळत आहे. येत्या काळात आम्ही उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी आपल्या पत्रात सांगितले आहे. पुण्यातील कोव्हिशिल्ड व्हॅक्सिन निर्मिती करणाऱ्या सीरम कंपनीत दिवसरात्र काम सुरु असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. देशातील कोरोना लसींची मागणी पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचेही त्यात सांगण्यात आले आहे. सीरमने यापूर्वी जून महिन्यात ६.५ कोटी लसींची निर्मिती केली जाईल, असे सांगितले होते. तसेच जुलैमध्ये ७ कोटी आणि ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये १० कोटी लसींची निर्मिती केली जाईल, असे सांगितले होते.