देशात मे महिन्यात सर्वाधिक मृत्यूची नोंद


नवी दिल्ली – देशातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी मृतांचा आकडा चिंता वाढवणारा आहे. इतर देशांच्या तुलनेत मृत्यूदर कमी असला तरी मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात मृत्यूदर वाढल्याचे दिसत आहे. मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात ५८,४३१ जणांचा मृ्त्यू झाला. या दरम्यान मृत्यूदर १.०६ टक्के एवढा होता. पण पुढच्या १४ दिवसात म्हणजे १६ मे ते २९ मे दरम्यान हा मृत्यूदर १.७३ टक्के नोंदवला गेला आहे.

या कालावधीत ५५,६८८ जणांचा मृत्यू झाला आहे. मे २०२१ या महिन्यात सर्वाधिक मृत्यूची नोंद केली गेली आहे. कोरोनामुळे १.१४ लाख लोकांनी जीव गमावला आहे. मे महिन्यात दर दिवसाला ३ हजार ९३५ जणांचा मृत्यू झाल्याचे या आकडेवारीवरून समोर येत आहे. देशातील आतापर्यंतचा मृत्यूदर १.१७ टक्के एवढा आहे.

मृत्यूदर जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आटोक्यात येईल असे जाणकारांचे म्हणणे आहे. कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्यामुळे मृत्यूदरही कमी होईल, असे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर देशात लसीकरण मोहीम आणखी वेगाने वाढवण्याची मागणी होत आहे. तसेच कोरोना नियमावलीचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

दरम्यान आज दिल्लीत ९४६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. सलग दुसऱ्या दिवशी हजाराच्या खाली रुग्ण आढळून आले आहेत. तर १३ एप्रिलपासून आतापर्यंत सर्वात कमी मृत्यूंची नोंद झाली आहे. मागच्या २४ तासात ७८ जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीतील कोरोना स्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सहाव्यांदा लॉकडाऊन वाढवला आहे. आता ७ जूनपर्यंत लॉकडाउन असणार आहे. तर दूसरीकडे गेल्या २४ तासात मुंबईत १ हजार ६६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचा दर ९४ टक्के एवढा आहे. रुग्ण दुप्पटीचा वेग हा ४१४ दिवसांवर पोहोचला आहे.