मोदींच्या आढावा बैठकीत उशिरा पोहोचल्यामुळे बंगालच्या मुख्य सचिवांची तडकाफडकी बदली


नवी दिल्ली : केंद्र सरकारने पश्चिम बंगालचे मुख्य सचिव अल्पन बंडोपाध्याय यांच्यावर कठोर कारवाई करत त्यांची तात्काळ बदली केली आहे. त्यांची बंगालमधून तडकाफडकी बदली करुन 31 मे रोजी सकाळी दहा वाजेपर्यंत भारत सरकारच्या डीओपीटीमध्ये हजर राहण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर त्यांना तात्काळ रिलीव्ह करण्यास पश्चिम बंगाल सरकारला सांगण्यात आले आहे. त्यांची पुढील पोस्टिंग कुठे होणार हे अद्याप स्पष्ट नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘यास’ चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली होती. अल्पन बंडोपाध्यात या बैठकीला सुमारे अर्धा तास उशिरा पोहोचले होते आणि काही वेळ थांबल्यानंतर त्यांनी बैठकीतून काढता पाय घेतला. त्यांचे हे वर्तन सेवा नियमांच्याविरोधात असल्याचे म्हटले जात आहे.

‘यास’ चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पश्चिम बंगाल आणि ओदिशाच्या दौऱ्यावर होते. त्यांनी ओदिशा आणि पश्चिम बंगालच्या नुकसानग्रस्त भागाची हवाई पाहणी केली. पंतप्रधान मोदी यांची दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह मुख्य सचिव आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत पूर्वनियोजित आढावा बैठक होती.

काल सर्वात आधी मोदींनी भुवनेश्वरमध्ये ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक आणि सरकारमधील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत ओदिशा आणि पश्चिम बंगालमध्ये चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. या बैठकीत केंद्र सरकारमधील मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि इतर स्थानिक नेतेही उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओदिशानंतर पश्चिम बंगालचा दौरा केला. या दौऱ्यानंतर त्यांना बंगालमधील नुकसानीचा आढावा घ्यायचा होता. पण पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या बैठकीत सुमारे अर्धा तास उशिरा पोहोचल्या. त्यांच्यासह राज्य सरकारकडून मुख्य सचिव अल्पन बंडोपाध्याय यांनाही आढावा बैठकीत सहभागी व्हायचे होते. परंतु तेही उशिरा पोहोचले. त्यानंतर काही वेळातच मुख्यमंत्र्यांसह त्यांनीही बैठकीतून काढता पाय घेतला.

नियमानुसार पंतप्रधान जर एखाद्या राज्यात अशी आढावा बैठक घेत असतील, तर सेवा नियमाप्रमाणे राज्याचे मुख्य सचिव किंवा त्यांच्या जागी त्याच दर्जाचे अधिकारी बैठकीत उपस्थित राहणे अनिवार्य असते. परंतु पंतप्रधानांच्या बैठकीत त्यांनी वेळेवर न पोहोचणे हे सेवा नियमांचे उल्लंघन आहे. हीच बाब लक्षात घेऊन रात्री उशिरा केंद्र सरकारच्या अपॉईंटमेंट्स कमिटी ऑफ कॅबिनेटने भारतीय प्रशासकीय सेवा (कॅडर) नियम 1954 च्या अधिनियम 6(1) चा वापर करत 1987 बॅचचे अल्पन बंडोपाध्याय यांची तडकाफडकी बदली केली. तसेच त्यांना मुख्य सचिव म्हणून सेवामुक्त करावे, असे निर्देश राज्य सरकारला दिले. सोबतच 31 मे रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत त्यांना डीओपीटीमध्ये हजर राहण्यास सांगितले आहे.