देशातील कोरोनाबाधितांची संख्या होत आहे कमी


नवी दिल्ली : देशातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत आता काही प्रमाणात घसरण होत आहे. काल दिवसभरात देशात एक लाख 73 हजार नव्या कोरोनाबाधितांची भर पडली असून ही आकडेवारी गेल्या 45 दिवसांतील सर्वात कमी आकडेवारी आहे. तसेच काल दिवसभरात दोन लाख 84 हजार 601 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर 3617 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी देशात 1.86 लाख कोरोनाबाधितांची भर पडली होती, तर 3660 रुग्णांनी आपला जीव गमावला होता. केंद्रीय मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 20 कोटी 89 लाख 02 हजार 445 कोरोनाचे डोस देण्यात आले आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार, देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरण्यास सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन आणि इतर नियमांमध्ये सातत्याने शिथिलता आणली, तरीही देशातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात राहिल असेही आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. गुरुवारी घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील 20 दिवसांपासून देशात कोरोनाबाधितांची संख्या बऱ्याच अंशी नियंत्रणात येताना दिसत आहे.

महाराष्ट्रात शुक्रवारी 20,740 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, तर 31 हजार 671 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील रिकव्हरी रेट 93.24 टक्क्यांवर पोहचला आहे. दरम्यान आज 424 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. राज्यात नवीन कोरोनाबाधितांचा आलेख आज आणखी खाली आला आहे. रिकव्हरी रेट वाढल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.