आता घराजवळच्या लसीकरण केंद्रावर दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना घेता येणार लस


नवी दिल्ली : केंद्र सरकारने आता दिव्यांग आणि 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण सुलभ करण्यासाठी आणखी एक पाऊल उचलले येत आहे. दिव्यांग आणि ज्यांचे अद्याप लसीकरण झालं नाही किंवा ज्यांनी आतापर्यंत केवळ पहिला डोस घेतला आहे अशा 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणासाठी आता त्यांच्या राहत्या घराजवळच लसीकरण केंद्र उभारण्याची सूचना केंद्र सरकारने सर्व राज्यांना दिली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला दिव्यांग आणि 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणासाठी निअर टू होम कोविड वॅक्सिन सेंटर उभारण्याची नॅशलन एक्सपर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सिन अॅडमिनिस्ट्रेशन फॉर कोविड 19 या समितीने शिफारस केली होती. आता केंद्राने ती शिफारस मान्य केली असून सर्व राज्यांना निअर टू होम कोविड व्हॅक्सिन सेंटर सुरु करण्याची सूचना दिली आहे.

सर्व दिव्यांगाना आणि ज्येष्ठ नागरिकांना सरकारच्या या निर्णयामुळे आता त्यांच्या राहत्या घराजवळच कोरोनाची लस उपलब्ध होणार आहे. या गटाची शारीरिक स्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. या दोन गटांव्यतिरिक्त इतर कोणालाही निअर टू होम कोविड व्हॅक्सिन सेंटरमध्ये लस मिळणार नाही. इतर सर्व वयोगटातील लोकांचे लसीकरण नेमूण देण्यात आलेल्या ठिकाणीच होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.