यास चक्रीवादळ दरम्यान ७५० बालकांचा जन्म, ‘यास’ ठेवले नाव

ओदिशाच्या किनाऱ्यावर यास चक्रीवादळ जेव्हा घोंगावत होते त्या काळात ७५० नवे जीव जन्माला आले असल्याचे सरकारी आकडेवारी सांगते. अनेक पालकांनी आपल्या नवजात बालकाचे मग तो मुलगा असो की मुलगी, नाव ‘यास’ ठेवले असल्याचे समोर आले आहे. या चक्रीवादळाचे नाव ओमान मध्ये ठेवले गेले असून या फार्सी शब्दाचा अर्थ आहे मोगरा. इंग्रजी मध्ये याचा अर्थ जास्मीन असा आहे.

यातील काही बाळे यास ओरिसा किनारपट्टीवर दाखल झाले असताना जन्माला आली तर काही बाळे बालासोर जिल्हात ५० किमी दक्षिणेस असलेल्या बहानया येथे वादळ जमिनीवर धडकले तेव्हा जन्माला आली असे समजते. अनेकांनी हे वादळ कायम लक्षात राहील म्हणून बाळाचे नाव यास ठेवल्याचे सांगितले.

राज्य सरकारने वादळाचा धोका लक्षात घेऊन संबंधित भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले होते तेव्हाच त्यात ६५०० गर्भवती महिला आहेत हे लक्षात आले होते. अगदी दिवस भरत आलेल्या महिलांना डिलीव्हरी सेंटर व अन्य स्थानिक रुग्णालयात दाखल केले गेले होते. शेल्टर होम मध्ये काही बालके जन्माला आली. बालासोर जिल्ह्यात १६५ बालके जन्मली त्यातील ७९ मुले आहेत तर ८६ मुली आहेत.