मायावतींच्या बाबत आक्षेपार्ह विनोद केल्याप्रकरणी रणदीप हुडाला अटक करण्याची मागणी


मुंबई : आपल्या एका जुन्या व्हिडीओमुळे बॉलिवूड अभिनेता रणदीप हुडा अडचणीत आला आहे. सध्या सोशल मीडियावर रणदीपचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. तो बहुजन समाज पक्षाच्या सुप्रीमो मायावती यांचे नाव घेत आक्षेपार्ह शब्द वापरुन थट्टा करताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे. रणदीपचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांमध्ये संताप असून त्याला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली जात आहे.

रणदीप हुडा या व्हिडीओमध्ये सोशल मीडियाबद्दल बोलत आहे. यावेळी मी तुम्हा एक ‘डर्टी जोक’ सांगतो, असे तो समोर बसलेल्या प्रेक्षकांना बोलताना दिसत आहे. तो म्हणतो की, दोन मुलांसह मायावती जात असतात. यावेळी एक व्यक्ती त्यांना विचारतो की, ही जुळी मुले आहेत का?’ त्यावर मायावती म्हणतात नाही, एक चार वर्षांचा आहे आणि दुसरा आठ वर्षांचा. यानंतर रणदीप हुडा जे काही म्हणाला ते अनेकांना अजिबात आवडले नाही.

उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांचे स्वत:चे समर्थक आहेत, जे त्यांना ‘आयर्न लेडी’ म्हणतात. तसेच राज्यात स्वबळावर सत्ता स्थापन केल्यामुळे लोक त्यांचे कौतुकही करतात. परंतु रणदीप हुडाच्या आक्षेपार्ह विनोदामुळे लोकांमध्ये संताप आहे. अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला राग व्यक्त करत आहेत.

एका युझरने लिहिले आहे की, रणदीप हुडा हा जोक नाही. आजपर्यंत कोणत्याही पुरुष नेत्यावर थट्टा होत नाही आणि तुम्ही एका दलित आणि मागासांच्या महिला नेत्याची अशी अश्लील थट्टा केली आहे. जे चुकीचे आहे. तर आणखी एका युझरने लिहिले आहे की, तुमच्या आजूबाजूला अनेक महिला आहेत, मग तुम्ही आयर्न लेडी मायावती यांचीच थट्टा का केली?

बसपाच्या प्रमुख मायावती यांची काही दिवसांपूर्वी आपल्या एका जुन्या ट्वीटमुळे कॉमेडियन अबीश मॅथ्यूने माफी मागितली होती. त्या ट्वीटमध्ये मॅथ्यूने मायावती यांच्याबाबत अपमानास्पद गोष्टी लिहिल्या होत्या.