1 जून पासून बदलणार LPG गॅसपासून ITR फायलिंगपर्यंतचे 5 नियम


नवी दिल्ली : तुमच्याशी थेट निगडीत असणाऱ्या काही नियमांत 1 जूनपासून बदल होणार आहे. त्यापैकी हे पाच नियम तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत, त्याचा तुमच्या जीवनावर थेट परिणाम होऊ शकतो. बँकिंग संबंधित, आयटीआर संबंधित आणि एलपीजी गॅस संबंधित काही नियमात यामध्ये बदल होणार आहे. बँक ऑफ बडोदामध्ये 1 जूनपासून चेक पेमेंट करण्याची पद्धती बदलणार आहे. त्याचबरोबर एलपीजी गॅसच्या किंमतीत 1 जूनपासून बदल होईल, तुम्ही जर घरगुती एलपीजी गॅस घेत असाल तर तुम्हाला या नवीन किंमतीनुसार खरेदी करावी लागेल.

याच महिन्यात PPF, NSC, KVP आणि सुकन्या समृद्धी सारख्या Small Saving Schemes या योजनांच्या व्याजदरात बदल होईल. दर तीन महिन्यांनी या योजनांसाठी सरकारकडून नवे व्याजदर लागू केले जातात. जुने व्याजदर अनेकदा रिव्हाइज केले जातात. याआधी नवीन व्याजदर 31 मार्च 2021 रोजी 2020-21 या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीअंती लागू करण्यात आले होते. पण ते 24 तासांच्या आतमध्ये मागे घेऊन जुनेच दर लागू करण्यात आले होते. पण आता नवीन दर 30 जूनला लागू होण्याची शक्यता आहे.

1 जून 2021 पासून पॉझिटिव्ह पे कन्फर्मेशन बँक ऑफ बडोदाने ग्राहकांसाठी अनिवार्य केले आहे. फसवणुकीचे ग्राहक शिकार होऊ नये, हा यामागचा उद्देश्य आहे. पॉझिटिव्ह पे प्रणाली एक प्रकारे फ्रॉड शोधणारे टूल आहे. ग्राहकांने या सिस्टिम अंतर्गत चेक जारी केल्यानंतर बँकेला संपूर्ण माहिती देणे आवश्यक आहे. बँक ही माहिती चेक पेमेंट करण्याआधी क्रॉस चेक करेल. जर यामध्ये कोणताही गोंधळ आढळून आल्यास बँक तो चेक रिजेक्ट करेल.

एलपीजी गॅसच्या किंमतीमध्ये देखील एक जूनपासून बदल होऊ शकतो, काही वेळा या किंमती देखील स्थिर राहतात. दर महिन्याच्या पहिल्या तारखेला या नव्या किंमती जारी केल्या जातात. सध्या देशाची राजधानी असणाऱ्या दिल्लीमध्ये 14.2 किलोग्रॅमच्या एलपीजी सिलेंडरची किंमत 809 रुपये आहे, तर 19 किलोच्या कमर्शिअल गॅस सिलेंडरच्या किंमती देखील बदलू शकतात.

आता Google Photos या आपल्या अ‍ॅप्लिकेशनसाठी फ्री स्टोरेज सुविधा गुगल बंद करणार आहे. Google photos हे अ‍ॅप्लिकेशन जगभरातील कोट्यावधी युजर्स वापरतात. गुगल 1 जूनपासून प्रत्येक अकाउंटला एकूण 15 जीबी क्लाउड स्टोरेज देणार असून, त्यात गुगलच्या सगळ्या प्रॉडक्ट्समधील डेटाचा समावेश आहे. म्हणजेच एका अकाउंटचे Gmail, Google Docs, Sheets, Drives आणि गुगलच्या अन्य सेवांमध्ये मिळून एकूण 15 जीबी डेटा मोफत साठवता येऊ शकते. 15 जीबीपेक्षा जास्त स्टोरेजसाठी आता Google One चे सबस्क्रिप्शन घ्यावे लागणार आहे. त्यात 100 जीबीच्या स्टोरेजसाठी 19.99 डॉलर्स अर्थात 1460 रुपये भरावे लागतील.

इन्कम टॅक्स विभागाचे ई-फायलिंग पोर्टल 1 जून ते 6 जून बंद राहणार आहे. तर 7 जून रोजी इन्कम टॅक्स विभाग करदात्यांसाठी इन्कम टॅक्स ई-फायलिंगसाठी नवीन पोर्टल लाँच करेल. अर्थात आता 7 जूनपासून आयटीआर भरण्याची अधिकृत साइट बदलणार आहे. 7 जूनपासून ही साइट http://INCOMETAX.GOV.IN असेल. सध्या तुम्ही http://incometaxindiaefiling.gov.in या साइटचा वापर करत आहात.