महेश मांजरेकर करणार स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बायोपिकचे दिग्दर्शन


स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीदिनीच आज त्यांच्या आयुष्यावर आधारित एका मोठ्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. हा चित्रपट प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते महेश मांजरेकर घेऊन येणार आहे. नुकतीच याची घोषणा करण्यात आली आहे.

आज स्वांतत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती असून त्यांना यानिमित्त अनेकांकडून मानवंदना देण्यात आली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या समवेत अनेकांनी त्यांना आदरांजली वाहिली. तर त्यांच्या वरील एका चित्रपटाची दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी घोषणा केली आहे. चित्रपटाची निर्मिती संदीप सिंग हे करणार आहेत. त्यांनी सोशल मीडियावर याची माहिती दिली.


महेश मांजरेकर चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत, त्याचबरोबर तेच या चित्रपटाचे लिखाण देखील करणार आहेत. सोशल मीडियावर चित्रपटाचे पोस्टर संदीप सिंग यांनी शेअर केले आहे. यासोबतच एक कॅप्शन देखील लिहिले आहे. ते आपल्या कॅप्शनमध्ये लिहीतात, स्वातंत्र्याच्या इतिहासाची संपूर्ण गोष्ट जाणून घेणे अजून बाकी आहे. भेटा स्वांतत्र्यवीर सावरकरांना लवकरच. तसेच स्वातंत्र्यावीर सावरकरांची निंदा आणि कौतुक दोन्ही होते. त्यांच्या प्रतिमेचे फार ध्रुवीकरण करण्यात आले आहे. याचे कारण लोकांना अजूनही त्यांच्याविषयी माहिती नाही. पण या गोष्टीला कोणीच नकार देऊ शकत नाही, ती गोष्ट म्हणजे की ते स्वतंत्रता चळवळीचे मुख्य भाग होते. आमचा त्यांच्या जीवनावर, प्रवासावर दृष्टीक्षेप टाकण्याचा एक प्रयत्न आहे.

मीडियाशी बोलताना महेश मांजरेकर यांनी सांगितले की, सावरकरांच्या जीवनाने मी खूप प्रभावित झालेलो आहे आणि एक दिग्दर्शक म्हणून माझ्यासाठी एवढ्या मोठ्या व्यक्तिच्या जीवनावर चित्रपट करणे म्हणजे मोठ आव्हान आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांना या चित्रपटाची उत्सुकता आहे, पण चित्रपटातील मुख्य कलाकार तसेच आणखी कोणतीही बातमी उघड करण्यात आलेली नाही.