मराठा आरक्षणप्रश्नी शरद पवारांच्या भेटीला छत्रपती संभाजीराजे


मुंबई : मराठा आरक्षणप्रश्नी आज (27 मे) राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सिल्वर ओक या निवासस्थानी भेट घेतली. शरद पवारांना यावेळी मराठा आरक्षण प्रश्नी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे संभाजीराजे भेटीनंतर म्हणाले. तसेच उद्या मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांसोबत चर्चा करुन संध्याकाळी पत्रकार परिषद घेणार असल्याची माहितीही संभाजीराजे यांनी दिली.

मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. यानंतर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजाच्या भावना जाणून घेण्यासाठी महाराष्ट्राचा दौरा केला. दरम्यान त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. संभाजीराजे छत्रपती आज सकाळी साडेनऊ वाजता सिल्वर ओकवर पोहोचले. त्यानंतर नऊ वाजून 43 मिनिटांनी शरद पवारांची भेट घेऊन बाहेर आले. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 13 मिनिटे चर्चा झाली.

शरद पवारांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना संभाजीराजे म्हणाले की, मी गेले तीन-चार दिवस महाराष्ट्राचा दौरा केला. मराठा समाज किती अस्वस्थ आहे, किती दु:खी आहे, हे शरद पवारांना सांगितले. एकंदरीत मराठा समाजाची खदखद, त्यांची परिस्थिती पवारांच्या कानावर घातली. या प्रश्नी तुम्ही पुढाकार घेण्याची गरज असल्याचे त्यांना सांगितले. मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, नारायण राणे या सगळ्यांनी एकत्र येऊन मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याची भूमिका घ्यायला हवी. त्यांनी सगळे ऐकून घेतले आणि सकारात्मक दृष्टीकोन दाखवला. या प्रश्नावर उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा होणार आहे. तर संध्याकाळी मुंबई पत्रकार परिषद घेणार आहे.

काही मराठा संघटनांनी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर रस्त्यावर येऊन मोर्चा, आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. पण सध्या कोरोनाची परिस्थिती पाहता आंदोलन, मोर्चे टाळण्याचे आवाहन संभाजीराजेंनी केल्यामुळेच संभाजीराजे राज्यभर दौरा करुन मराठा समाजाचे म्हणणे, त्यांची परिस्थिती जाणून घेतली. त्यानंतर आज त्यांनी शरद पवार यांची सिल्वर ओकवर भेट घेऊन सर्व परिस्थिती मांडली.