आता थेट लसीकरण केंद्रांवर जाऊन स्तनदा मातांना घेता येईल कोरोना प्रतिबंधक लस


मुंबई – 19 मे 2021 रोजी केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने निर्गमित केलेल्या सुचनांनुसार, कोरोना प्रतिबंधक लस स्तनदा मातांनाही घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार, मुंबईतील शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर थेट येऊन नोंदणी करणाऱ्या (वॉक इन) स्तनदा मातांना कोविड लस देण्यात येणार आहे.

योग्य त्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करुन स्तनदा मातांचे लसीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये प्रसुती झाल्याची दिनांक, स्थळ यांसह आवश्यक वैद्यकीय कागदपत्रे तसेच वैद्यकीय माहिती महिलांनी समवेत बाळगणे आवश्यक आहे. आठवड्याचे पहिले तीन दिवस म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार या तीन दिवशी थेट येणाऱ्या विविध पात्र नागरिकांना लसीकरण करण्यात येते. त्यामध्ये आता स्तनदा मातांचाही समावेश करण्यात आला आहे. म्हणजेच सोमवार, मंगळवार, बुधवार या तीन दिवशी थेट येणाऱ्या (वॉक इन) स्तनदा मातांचे लसीकरण केंद्रामध्ये जागेवरच नोंदणी करुन लागलीच त्यांना लस देण्यात येईल.

दरम्यान, जर कोरोना प्रतिबंधक लस घेण्याची गरोदर स्त्रियांना इच्छा असेल, तर अशा गरोदर स्त्रियांना, त्यांच्यावर उपचार करीत असलेल्या स्त्री रोग तज्ज्ञाने त्यांच्या शीर्षपत्रावर (लेटरहेड), कोरोना लस देण्याबाबत तसेच लेखी प्रमाणपत्र देणे आवश्यक असेल. असे प्रमाणपत्र गरोदर स्त्रियांनी स्वतः स्त्री रोग तज्ज्ञांकडून प्राप्त केल्यानंतर कोरोना लस घेण्याबाबत स्वतःचे संमतीपत्र देखील द्यावे लागेल. लसीकरण केंद्रावर येताना सोबत स्त्री रोग तज्ज्ञांचे प्रमाणपत्र आणि संमतीपत्र अशी दोन्ही कागदपत्रे आणावी आणि लसीकरण केंद्राकडे सुपूर्द करावी. त्यानुसार, त्यांना कोविड प्रतिबंधक लस देण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल.