पुणे – अनोखे स्पेशल कोरोना चाईल्ड सेंटर पुण्यातील येरवड्यात सुरू करण्यात आले आहे. हे कोविड सेंटर पुणे महानगरपालिका आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून उभारले गेले आहे. पुणे महापालिका आणि सेंट्रल फॉर युथ डेव्हलपमेंट अँड अॅक्टिव्हिटीच्या संयुक्त विदयमाने हे सेंटर सुरु करण्यात आले आहे.
पुण्यातील येरवड्यात सुरु झाले अनोखे स्पेशल चाईल्ड कोरोना सेंटर
छोटे बेड्स, भिंतीवर आकर्षक चित्र, वेगवेगळ्या खेळण्या, विशेष भोजन व्यवस्था, मनोरंजनाच्या दृष्टीने वेगवेगळे उपक्रम या सगळ्यासोबत बालरोगतज्ञ आणि प्रशिक्षित मेडिकल स्टाफ याठिकाणी उपलब्ध आहेत. सेंटरमध्ये लहान मुलांना भीती वाटू नये याकरिता विशेष सजावट करण्यात आली आहे. लहान मुलांना आवडणारे मोठू-पतलू, छोटा भीमचे कार्टुन्सही भिंतीवर रेखाटण्यात आले आहेत. लहान मुलांकरिता आनंददायी असे वातावरण येथे निर्माण करण्यात आले आहे.
लहान मुलांसाठी 40 बेडची व्यवस्था या कोविड सेंटरमध्ये करण्यात आली आहे. लहान मुलांच्या पालकांचीही राहण्याची सुविधा कोविड सेंटरमध्ये उपलब्ध करुन दिली आहे. ऑक्सिजन बेड, अॅम्ब्युलन्स 24 तास सेवा येथे देण्यात आली आहे. लहान मुलांना वेगवेगळे चित्रपट दाखवण्याची व्यवस्था सुद्धा असून मुलांना कोणत्याही प्रकारे या संकटातून बाहेर काढण्याची तयारी येथे करण्यात आली आहे.