वुहान लॅबमधील तीन संशोधक कोरोना पसरण्याच्या एक महिना आधी पडले होते आजारी


वॉशिंग्टन : संपूर्ण जगाला कोरोनाने विळखा घालून आता दीड वर्ष पूर्ण झाली आहेत. पण या व्हायरसच्या उत्पत्तीबाबत अद्यापही सगळ्यांच्या मनात प्रश्न घर करुन आहे. या व्हायरसबाबत एक गुप्त अहवाल याचदरम्यान समोर आल्यामुळे पुन्हा एकदा चीनकडे जगाच्या नजरा वळल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग होण्याच्या एक महिना आधी चीनच्या वुहान लॅबमधील तीन संशोधक आजारी पडले असल्याचे समोर आले आहे.

यासंदर्भात अमेरिकेचे वृत्तपत्र द वॉल स्ट्रीट जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, नोव्हेंबर 2019 मध्ये वुहान इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजीचे तीन संशोधक आजारी पडले होते आणि ते रुग्णालयात दाखल झाले होते. या वृत्तात वुहान लॅबमधील आजारी संशोधकांची संख्या, त्यांची आजारी पडण्याची वेळ आणि रुग्णालयात दाखल होण्याची संपूर्ण माहिती आहे.

या वृत्तामुळे वुहान लॅबमधून कोरोना पसरल्याची शक्यता असल्याच्या दाव्याच्या तपासासाठी बळ मिळेल, अशी आशा आहे. हे वृत्त जागतिक आरोग्य संघटनेच्या बैठकीच्या एक दिवस आधी आले आहे. कोरोनाच्या उगमाबाबत पुढील टप्प्याच्या तपासावर या बैठकीत चर्चा होण्याचा अंदाज आहे.

वॉल स्ट्रीट जर्नलच्या या वृत्तावर अमेरिकेच्या सुरक्षा परिषदेचे प्रवक्त्यांनी कोणतीही टिप्पणी केलेली नाही. पण, जो बायडन प्रशासन ‘कोरोनाव्हायरसच्या उगमाच्या तपासाबाबत गंभीर आहे, असं त्यांनी सांगितलं. याआधी जागतिक आरोग्य संघटनेची एक टीम महामारीशी संबंधित तथ्यांचे कारण शोधण्यासाठी वुहानला गेली होती. पण वुहानच्या लॅबमधूनच कोरोना जगभरात पसरला हे सिद्ध करण्यासाठी आवश्यक तथ्ये नसल्याचे डब्लूएचओने म्हटले होते. जागतिक आरोग्य संघटनेला तपासात संपूर्ण सहकार्य न केल्याचा आणि वुहान लॅबशी संबंधित माहिती लपवण्याचा आरोपही चीन झाला होता.

कोरोनाचा उल्लेख ‘चिनी व्हायरस’ आणि ‘वुहान व्हायरस’ असा अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे करत होते आणि चीनने यावर आक्षेप नोंदवला होता. याआधी मिळालेल्या माहितीनुसार, मानवी पेशींवर या व्हायरसच्या प्रभावबाबत चीनमध्ये 2015 पासून प्रयोग सुरु होते. हे प्रयोग वुहानच्या वायरॉलॉजी इन्स्टिट्यूटमध्ये सुरु होते आणि यात बॅट लेडी नावाने प्रसिद्ध महिला संशोधक शी झेंग-ली यांचा समावेश होता. अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिना युनिव्हर्सिटीचे मुख्य कोरोना संशोधक राल्फ एस बॅरिक यांच्यासोबत शी झेंग-ली या काम करत होत्या.