प्रॅक्टिसच्या परवानगीआधी टीम इंडियाला जावे लागणार तीन दिवसांच्या हार्ड क्वारंटाईनमधून


नवी दिल्ली : 18 ते 22 जूनपर्यंत न्यूझीलंड विरोधात कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळण्यासाठी टीम इंडिया इंग्लंडला रवाना होणार आहेत. तसेच चार ऑगस्टपासून 14 सप्टेंबरपर्यंत इंग्लंड विरोधात पाच कसोटी सामन्यांची मालिकाही खेळणार आहे. इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाला आयसीसी विश्व कसोटी करंडक फायनलच्या आधी क्वारंटाईन दरम्यान बायोबबल काळात टीम इंडियाला साउदाम्प्टनमध्ये प्रॅक्टिस करण्याची परवानगी देण्याआधी तीन दिवसांच्या हार्ड क्वारंटाईनमधून जावे लागण्याची शक्यता आहे.

2 जून रोजी मुंबईवरुन भारतीय संघ इंग्लंडला रवाना होणार आहे. तिथे पोहोचल्यानंतर टीम इंडियाला 10 दिवसांचा आयसोलेशन कालावधी पूर्ण करावा लागणार आहे. पण अद्याप याबाबत निश्चित माहिती मिळालेली नाही. पण संघांना सराव करता यावा यासाठी बीसीसीआय आणि इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डासोबत (ईसीबी) चर्चा सुरु असल्याची माहिती आहे.

जवळपास तीन महिन्यांचा टीम इंडियाचा इंग्लंड दौरा असेल. शेवटचा कसोटी सामना 14 सप्टेंबरला खेळवला जाईल. न्यूझीलंडविरुद्ध विश्व कसोटी चॅम्पियनशिप अंतिम सामना आणि इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांच्या मालिकेत देखील एका महिन्याचं अंतर असल्यामुळे टीमच्या खेळाडूंना परिवाराला सोबत ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

भारतीय संघ: विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उप-कर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, मयंक अंग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, ऋषभ पंत (विकेटकीपर), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर, उमेश यादव.