‘ही’ शूज उत्पादक कंपनी धावली झिम्बाव्वे क्रिकेटपटूच्या मदतीला


नवी दिल्ली – शूजसाठी प्रायोजक मिळत नसल्याची खंत झिम्बाब्वेचा क्रिकेटपटू रायन बर्लने सोशल मीडियाद्वारे व्यक्त केली होती. ट्विटरद्वारे आपली कळकळ त्याने व्यक्त केली होती. आम्हाला प्रायोजक मिळेल का, जेणेकरून प्रत्येक मालिकेनंतर आम्हाला आमचे शूज चिकटवावे लागणार नसल्याचे बर्लने म्हटले होते.


बर्लच्या या विनंतीनंतर त्याच्या मदतीसाठी पुमा (PUMA) कंपनी धावली आहे. बर्लला पुमाने स्पॉन्सरशिप दिली असून आता यापुढे शूज चिकटवायची गरज नसल्याचे त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये सांगितले. बर्लने या गोष्टीनंतर पुमाचे आभार मानले आहेत. भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगनेही त्याला पुमा तुझ्या मदतीसाठी उभे राहिल्याचे ट्वीट केले. त्याला प्रत्युत्तर देत बर्लने म्हटले, तू या ब्रँडचा खूप काळ साथीदार होतास आणि हे प्रेरणादायी आहे, त्यामुळे या ब्रँडशी जोडल्यानंतर मी खूप आनंदी आहे.


कमाईच्या स्वरुपात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्यांना बक्कळ पैसा मिळतो, असा समज सर्वांना असतो. अनेक क्रिकेटपटू क्रिकेटव्यतिरिक्त जाहिरातबाजी, प्रमोशन इत्यादी स्वरुपातही पैसे कमावतात. क्रिकेटपटू सध्याच्या काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत नसला, तरी तो आयपीएलसारख्या टी-२० लीगमधूनही चांगली कमाई करू शकतो. भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि अशा क्रिकेट खेळणाऱ्या देशांमधील खेळाडूंकडे खूप पैसे आहेत. पण झिम्बाब्वे, स्कॉटलंड आणि नेपाळसारख्या छोट्या देशांचे खेळाडूही क्रिकेट खेळतात, पण ज्यांना जास्त पैसे कमावता येत नसल्यामुळे अशा क्रिकेटपटूंच्या आर्थिक विवंचनेच्या चर्चा समोर येतात. असेच काहीसे झिम्बाब्वेचा क्रिकेटपटू रायन बर्लच्या बाबतीत घडले होते.