पद्मश्री पुरस्कार विजेत्या कलिमउल्लांनी आंब्यांच्या नव्या प्रजातींना दिली कोरोना योद्ध्यांची नावे


आंब्याच्या काही नवीन प्रजाती कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये मँगोमॅन हाजी कलिमुल्ला खान यांनी निर्माण केल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांनी या प्रजातींना कोरोना योद्ध्यांची नावे दिली आहेत. आंब्यांच्या नव्या प्रजातींना कोरोनाच्या साथीमध्ये प्राण गमावलेल्या डॉक्टर्स, पोलीस कर्मचारींच्या सन्मानार्थ त्यांची नावे देण्यात आली आहे. ७४ कलिमउल्ला खान यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.

कलिमउल्ला यांनी कोरोना काळामध्ये विकसित केलेल्या नवीन आंब्यांच्या प्रजातीसंदर्भात एएनआयशी खास चर्चा केली. अनेक डॉक्टरांचा कोरोनाच्या संकटकाळात रुग्णांवर उपचार करताना मृत्यू झाल्याचे मला समजले. पण या डॉक्टरांनी जगायला हवे होते, असे मला वाटले. म्हणून त्यांचे नाव मी आंब्यांना देण्याचा निर्णय घेतला. अशाच प्रकारे अनेक पोलीस कर्मचाऱ्यांचाही लॉकडाऊनदरम्यान राष्ट्रीय कर्तव्य पार पाडताना मृत्यू झाला. त्यांचे नावही मी आंब्याच्या एका प्रजातीला दिले आहे. लोकांचे प्राण वाचवण्यासाठी या लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती हे या प्रजातींमुळे जनतेच्या कायमच लक्षात राहील. या नावांच्या रुपाने हे कोरोनायोद्धे आपल्या आठवणींमध्ये सदैव जिवंत राहतील, असे कलिमउल्ला म्हणाले.

कलिमउल्ला मागील अनेक वर्षांपासून आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींच्या नावाने आंब्याच्या प्रजाती विकसित करण्याचे काम करत आहेत. अशा आगळ्यावेगळ्या पद्धतीने देशातील एखाद्या क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार केला पाहिजे, असे कलिमउल्लांचे मत आहे. जगात अनेक माणसे आहेत, पण प्रत्येकजण जगावेगळे काम करत नाही. मी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये चांगले काम करणाऱ्या व्यक्तींची नावे आंब्यांच्या प्रजातींना देतो. त्यामुळे सामान्यांना प्रेरणा मिळते.

उदाहरणार्थ भारताने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय स्तरावर नवीन शिखरे सर केली आहेत. २०१९ साली वेगवेगळ्या देशांचे प्रमुख मोदींच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिल्याचे पाहून खूप आनंद झाला होता, असे कलिमउल्लांनी सांगितले. त्यांनी सर्वातआधी २०१५ मध्ये मोदींच्या नावाने एका प्रजातीला ‘नमोआम’ असे नाव दिले होते. त्यानंतर मोदी आम नावानेही एक प्रजाती त्यांनी विकसित केलेली.

आंब्याच्या नवीन प्रजाती विकसित करण्याची कलिमउल्ला यांना आवड आहे, त्यांनी अनेक प्रजातींना सेलेब्रिटीजची नावे दिली आहेत. त्यात योगी आदित्यनाथ, सोनिया गांधी, अखिलेश यादव, ऐश्वर्या राय, सचिन तेंडुलकर व इतरांचा समावेश आहे. या व्यक्तींना अजरामर करण्यासाठी आपण आंब्याच्या प्रजातींना त्यांची नावे दिली आहेत, असे ते सांगतात.

मलिहाबाद येथे त्यांची आंब्याची बाग असून ती पाच एकरात आहे. शंभर वर्षांपूर्वीचे आंब्याचे झाड तेथे आहे, त्याच्यावर त्यांनी १९८७ मध्ये कलमे करून नवीन प्रजाती तयार केल्या. त्यांनी आंब्याच्या काही प्रजातींना त्यांच्या घरातील व्यक्तींचीही नावे दिली आहेत. कलिमउल्ला यांच्या जादूच्या झाडातून आंब्याच्या तीनशे प्रजाती तयार केल्या आहेत व प्रत्येक फळ वेगवेगळ्या आकाराचे व रंगाचे आहे. त्यांच्या कार्यासाठी त्यांना पद्मश्री देऊन गौरवण्यात आले.