ब्लॅक आणि व्हाइट फंगसनंतर आता उत्तर प्रदेशात आढळला यल्लो फंगसचा पहिला रुग्ण


लखनौ – एकीकडे देशात म्युकरमायकोसिसच्या (ब्लॅक फंगस) रुग्णांची संख्या वाढत असतानाच व्हाइट फंगस म्हणजेच पांढऱ्या बुरशीसंदर्भातही काही दिवसांपूर्वी इशारा देण्यात आला आहे. त्यातच आता यल्लो फंगसचाही पहिला रुग्ण उत्तर प्रदेशमधील गाझीयाबादमध्ये आढळून आला आहे.

धक्कादायक बाब म्हणजे ब्लॅक फंगस आणि व्हाइट फंगसपेक्षा अधिक यल्लो फंगसचा संसर्ग हा धोकादायक असल्याचे सांगण्यात येत आहे. यल्लो फंगसच्या या पहिल्या रुग्णावर शहरातील कान नाक घसा तज्ज्ञ असणाऱ्या ब्रिज पाल त्यागी यांच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरु असल्याचे डीएनए या इंग्रजी संकेतस्थळाने दिलेल्या आपल्या बातमीत म्हटले आहे.

यल्लो फंगसच्या संसर्गाच्या लक्षणांमध्ये सुस्ती येणे, भूक न लागणे किंवा वजन कमी होणे ही प्राथमिक लक्षणे आहेत. गंभीर प्रकरणांमध्ये जखमांमधून पू बाहेर येणे आणि जखमा भरण्यासाठी गरजेपेक्षा अधिक वेळ लागण्याच्या समस्या उद्भवतात. कधीकधी अवयव निकामी होणे, डोळ्यांचा आकार कमी होणे, डोळे कोरडे पडणे अशी लक्षणंही दिसून येतात.

यल्लो फंगसची सर्वात चिंताजनक बाब म्हणजे याचा संसर्ग झाल्याचे तातडीने कळत नाही. शरीराअंतर्गत याचा संसर्ग झाल्यानंतर हळूहळू लक्षणे दिसू लागतात. त्यामुळेच काहीही लक्षणे दिसली तरी तातडीने औषधोपचार घेण्याचा सल्ला डॉक्टर दिला आहे. सध्या यल्लो फंगसवर अ‍ॅम्फोटेरिसिन बी इंजेक्शन हा एकमेव इलाज आहे. हे इंजेक्शन बुरशीसदृश्य आजारांवर दिले जाते.

यल्लो फंगसचा संसर्ग होण्यामागील मुख्य कारण म्हणजे अस्वच्छता. घरातील तसेच शारीरिक स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे. घरामधील जुने आणि खाण्यास योग्य नसणारे अन्नपदार्थ आणि विष्ठा, मलमुत्र वेळोवेळी स्वच्छ करणे आणि घरात घाण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

अस्वच्छतेमुळे घरामध्ये बॅक्टेरिया आणि बुरशीच्या वाढीला वाव मिळतो. घरामध्ये किती दमटपणा आहे यावरही यल्लो फंगसच्या संसर्ग होऊ शकतो की नाही याचा अंदाज बांधता येतो. घरात दमटपणा अधिक असेल तर बॅक्टेरिया आणि बुरशीच्या वाढीला अधिक वाव मिळतो. घरामध्ये ३० ते ४० टक्के दमट वातावरण हवे. जास्त बाष्प असणाऱ्या वातावरणामध्ये राहण्यापेक्षा दमटपणा कमी असलेल्या वातावरणात राहणे आरोग्यासाठी अधिक फायद्याचे असते.