रेड झोन वगळता राज्यातील लॉकडाऊन 1 जूननंतर शिथिल होण्याची विजय वडेट्टीवार यांनी वर्तवली शक्यता


मुंबई : राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी महाराष्ट्रातील कोरोना संसर्ग असलेल्या रेड झोनमधील जिल्हे वगळता राज्यातील लॉकडाऊन 1 जूननंतर शिथिल होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यांनी ही शक्यता पत्रकार परिषदेत वर्तवली आहे. राज्यातील 14 जिल्हे रेड झोनमध्ये असल्यामुळे त्यामुळे रुग्णसंख्या बघूनच लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला जाईल, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असल्यामुळे राज्यातील लॉकडाऊन शिथिल करण्याची मागणी जोर धरत असल्यामुळे राज्य सरकार रेड झोनमधील जिल्हे वगळता इतर जिल्ह्यातील लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्याच्या विचारात आहे. पुढच्या पाच ते सहा दिवसात काय परिस्थिती असेल हे पाहून निर्णय घेतला जाईल, अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली.

रेड झोनमधील जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आठवड्याभर आढावा घेऊन जिल्हानिहाय त्याबाबत निर्णय घेतले जातील. रेड झोनमधील जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी झाली नाही, तर कडक निर्बंध कायम राहणार असल्याचेही वडेट्टीवार यांनी सांगितले.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, कालच्या माहितीप्रमाणे राज्यातील 14 जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. तेथील निर्बंध सरसकट शिथिल करता येणार नाहीत. कन्टेन्मेंट झोन करुन तिथे नियम कडक करावे लागतील, तर जिथे रुग्ण संख्या कमी तिथे नियम शिथिल करावे लागतील.

त्याचबरोबर मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे, पण संपलेला नाही. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल ट्रेन आम्ही सुरु ठेवल्या आहे आणि त्याचा परिणाम दिसत आहे. काही वेळ तरी यावर निर्बंध ठेवावे लागतील. सरसकट सूट दिली तर गर्दी होईल. त्यामुळे लोकल पुढील 15 दिवस तरी सर्व प्रवाशांसाठी खुली करता येणार नसल्याचे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

रुग्णसंख्या वाढत असणाऱ्या जिल्ह्यातील कोरोनाबाधिताला घरातच क्वारंटाईन करण्याची सुविधा रद्द करण्यात आली आहे. तिथे कोविड सेंटर किंवा संस्थेमध्येच क्वारंटाईन केले जाणार आहे. कोरोनाबाधितांना गृह विलगीकरण ठेवण्यात अर्थ नाही. कारण यामुळे कुटुंबच्या कुटुंब कोरोनाबाधित होत असल्यामुळे त्यामुळे त्यांना संस्थात्मक विलगीकरणातच ठेवले पाहिजे, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.