एका घागरीपेक्षा अधिक पाण्याचा उपसा केल्यास या गावात ठोठाविला जातो दंड


आपल्या दररोजच्या जीवनामध्ये पाण्याचा कितीतरी अपव्यय आपण कळत नकळत करत असतो. पण भारतातील दुष्काळात होरपळणाऱ्या काही प्रांतांममध्ये ही चैन तेथील नागरिकांना परवडण्यासारखी नाही. या प्रांतांमध्ये मनुष्याला तहान भागविण्यापुरते पाणी मिळविणे हे देखील मोठ्या जिकीरीचे काम होऊन बसले आहे. अशीच काहीशी परिस्थिती छत्तीसगड राज्यातील बस्तर गावामध्ये आहे. या ठिकाणी एखाद्याने एका घागरीपेक्षा अधिक पाण्याचा उपसा केला, तर त्याच्यावर दंड ठोठाविण्याची पाळी या गावातील पंचायतीवर आली आहे. पाण्याचे इतके दुर्भिक्ष बस्तर आणि त्याच्या आसपासच्या गावांमध्ये आहे.

बस्तर जिल्ह्यामध्ये पाण्याची समस्या ही दर उन्हाळ्याची कहाणी आहे. बस्तर जिल्ह्यातील सुमारे दहा ते बारा गावांमध्ये परिस्थिती फारच बिकट असून, पाण्याचा दुरुपयोग रोखण्यासाठी गावातील पंचायतीने एका घागरीपेक्षा अधिक पाणी वापरणाऱ्याला दंड करण्याचा निर्णय घेतला आहे. बस्तर जिल्ह्यातील गावांमध्ये पाण्याचे स्रोत असलेल्या बहुतेक विहिरी आटल्या असून, भूजलाची पातळीही खूपच खालावली आहे. अशा वेळी बस्तर जिल्ह्यातील लेण्ड्री गावाच्या पंचायतीने एक नवा निर्णय घेत, आवश्यकतेपेक्षा अधिक पाण्याचा उपसा करणाऱ्यावर प्रती बादली पन्नास रुपये दंड वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे.

या नव्या नियमाचा इच्छित परिणाम दिसून आला असून, ग्रामस्थ देखील आपला आवश्यकतेनुसारच पाण्याचा उपसा करीत असल्याने पाण्याचा व्यर्थ अपव्यय टाळला जात आहे. ग्रामस्थांना एका वेळी एकच घागर भरून घेण्यास परवानगी आहे. एकाहून अधिक बादल्या किंवा घागरी आणताना कोणी आढळले, तर जितक्या घागरी अधिक तितका दंड गावकऱ्यांना भरावा लागणार आहे.

Leave a Comment