शरीरातील चरबी घटविण्यासाठी या सवयींचा करा अवलंब

fat
शरीरामध्ये साठलेली चरबी आणि हाताबाहेर वाढलेले वजन यांमुळे व्यक्ती अनाकर्षक तर दिसू लागतेच, पण त्याशिवाय वाढणारे वजन आणि चरबी अनेक आजारांना निमंत्रण ठरू शकते. त्यामुळे वजन घटविण्यासाठी आहारावर नियंत्रण आणि सक्रीय जीवनशैली यांची आवश्यकता असते. अनेक जण आहारामध्ये तात्पुरते बदल करून, भरपूर व्यायाम करून वजन घटविण्यात यशस्वी होतात देखील, मात्र एकदा वजन कमी झाल्यानंतर आहार पूर्वपदावर जातो आणि घटलेले वजन पुन्हा वाढू लागते. त्यामुळे वजन आणि शरीरातील चरबीचे प्रमाण कमी करावयाचे असल्यास आहाराशी आणि जीवनशैलीशी निगडित काही सवयींचा अवलंब कायमस्वरूपी असायला हवा.
fat1
वजन घटविण्यासाठी आहारामध्ये फायबरची मात्रा योग्य असणे आवश्यक आहे. ताज्या भाज्या, फळे यांच्या माध्यमातून शरीराला आवश्यक ते फायबर मिळत असते. फायबरमुळे पोट दीर्घकाल भरलेले राहून भूक लवकर शमते, तसेच यामुळे पचनक्रिया अधिक सक्रीय होते. फायबरमुळे शरीरातील इंस्युलीनची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. या साठी शरीराला दररोज पंचवीस ते तीस ग्राम फायबरची आवश्यकता असते. फायबर सोबतच आपल्या आहारामध्ये प्रथिनांचा ही समावेश असायला हवा. ताज्या भाज्या, मासे, अंडी, इत्यादी पदार्थांमध्ये प्रथिने मोठ्या प्रमाणावर असतात. यांमुळे स्नायूंना बळकटी मिळून शरीरातील चरबी घटण्यास मदत होत असते.
fat2
आपल्या आहारामध्ये ‘व्हाईट कार्ब्स’, म्हणजेच मैद्यापासून बनलेल्या पदार्थांचा समावेश मर्यादित असावा. साखर, पास्ता, ब्रेड, केक सारखे पदार्थ थोड्याच प्रमाणात खाल्ले जावेत, तसेच बटाटा आणि भात देखील मर्यादित प्रमाणात खाल्ला जावा. शरीरामध्ये योग्य आर्द्रता ठेवण्यासाठी आवश्यक त्या प्रमाणात पाणी पिणेही महत्वाचे आहे. पोषक घटक पाण्याच्या माध्यमातून शरीरामध्ये पोहोचविले जात असतात. त्यामुळे पाण्याचे सेवन आवश्यक आहे. आपल्या आहारातून साखरयुक्त पेये, सोडा किंवा तत्सम पेये वर्ज्य करावीत. तसेच चहा व कॉफीचे प्रमाणही मर्यादित असावे. शक्य असेल, तेव्हा चहा किंवा कॉफीऐवजी साधे पाणी, नारळ पाणी, ताज्या भाज्यांचा किंवा फळांचा (साखरविरहित) रस, ताजे ताक यांचा समावेश आहारामध्ये असावा.
fat3
व्यायाम करत असताना ‘कार्डियो’चे प्रमाण योग्य असावे. या प्रकारचे व्यायाम केल्याने शरीरातील चरबी वेगाने घटू लागते हे खरे असले, तरी हे व्यायाम प्रमाणाबाहेर केल्याने कालांतराने शरीर चरबी सोबत ‘मसल बर्न’ देखील करू लागते. त्यामुळे अश्या व्यायामाचे प्रमाण आठवड्यातून तीस मिनिटांची तीन ते चार सेशन्स, इतकेच असावे. आहार, व्यायाम, आर्द्रता, यांच्याबरोबर आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे योग्य प्रमाणात घेतलेली झोप. शरीरातील चरबी घटण्याची प्रक्रिया व्यक्ती झोप घेत असताना सुरु असते. त्यामुळे आठ ते तास तासांची सलग विश्रांती शरीराला मिळणे आवश्यक आहे. वजन घटविण्याची प्रक्रिया ही प्रत्येकाच्या शरीराच्या बाबतीत निरनिराळ्या वेगाने घडून येणारी आहे. त्यामुळे इतरांशी तुलना न करता सातत्याने प्रयत्न सुरु ठेवणे आवश्यक आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment