अनियमित मासिक पाळीकरिता महिलांनी आजमावावे हे घरगुती उपाय


महिलांना दर महिन्याला होणारा मासिक धर्म हा त्यांच्या शरीरांमध्ये मोठे बदल घडवून आणणारा असतो. ही प्रक्रिया संपूर्ण नैसर्गिक असली, तरी अनेक महिलांना या दिवसांमध्ये अतिशय त्रास सोसावा लागतो. मासिक धर्म सुरु होण्याआधी किंवा सुरु असताना पोटात दुखणे, पाय दुखणे, पाठीमध्ये किंवा स्तनांमध्ये वेदना असे त्रास अनेक महिलांच्या बाबतीत सामान्यपणे दिसून येत असतात. त्यातून काही महिलांची मासिक पाळी अनियमित असल्याने त्यामुळेही अनेक समस्या उद्भवतात. मासिक पाळी अनियमित असण्यामागे अनेक कारणे असू शकतात, त्यामुळे पाळी अनियमित होण्यामागे नेमके काय कारण आहे हे जाणून घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते. डॉक्टरांनी सुचविलेल्या औषधोपचारांच्या बरोबरच काही घरगुती उपायांचा अवलंबही या बाबतीत करता येण्यासारखा आहे. या उपायांमुळे मासिक धर्माची अनियमितता पुष्कळ अंशी कमी होऊ शकते.

दररोज रात्री झोपण्यापूर्वी दोन चमचे आख्खे धणे अर्धा ग्लास पाण्यामध्ये भिजत घालावेत. हे धणे रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवावेत. सकाळी उठल्यानंतर या पाण्यामध्ये आणखी थोडे पाणी मिसळून हे पाणी धण्यासहित उकळायला ठेवावे. पाणी उकळून निम्मे झाले, की गॅस बंद करून हे पाणी थंड होऊ द्यावे. थंड झाल्यावर हे पाणी गाळून घ्यावे आणि रिकाम्यापोटी त्याचे सेवन करावे. या उपायामुळे पाळीची अनियमितता कमी होईल व त्यासोबत पाळीच्या वेळी उद्भविणाऱ्या वेदनांपासूनही आराम मिळेल. पपईच्या सेवनानेही पाळीच्या दरम्यान होणारा रक्तस्राव सुरळीत राहतो.

अनेक महिलांना पुरेसे पोषक अन्नघटक मिळत नसल्याने त्यांचा मासिक धर्म अनियमित असू शकतो. अशा वेळी पोषक आणि संतुलित आहार घेण्यावर अधिक भर द्यायला हवा. आहारामध्ये ताज्या ताकाचा समावेश केला जाऊन दररोजच्या भोजनामध्ये ताक अवश्य असावे. ताकामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, प्रथिने आणि ब जीवनसत्वे असतात. त्याचप्रमाणे आहारामध्ये लोह युक्त अन्नपदार्थ, ताज्या हिरव्या पालेभाज्या आणि ताज्या फळांचा समावेश असावा. गुळामध्ये लोह आणि क्षार मुबलक मात्रेमध्ये असतात. त्यामुळे मासिक पाळी अनियमित असलेल्या महिलांनी आहारामध्ये गुळाचा समावेशही अवश्य करावा.

कोरफड, म्हणजेच अलो व्हेराचा गर, अनियमित मासिक पाळी असल्यास, तसेच पाळीच्यावेळी रक्तस्राव जास्त असल्यास उपयुक्त ठरतो. ताज्या कोरफडीचा गर एक चमचा घेऊन त्यामध्ये एक चमचा मध मिसळावा व या मिश्रणाचे सेवन नियमित करावे. धण्याप्रमाणे जिरे देखील रात्रीभर पाण्यामध्ये भिजत घालून दुसऱ्या दिवशी सकाळी पाण्यामध्ये उकळून घेऊन या पाण्याचे सेवन केल्याने पाळीची अनियमितता दूर होण्यास मदत होते. दररोज गरम दुधामध्ये हळद घालून याचे सेवन केल्याने शरीरातील हार्मोन्सचे संतुलन सांभाळण्यास मदत मिळते व त्यामुळेही मासिक पाळीची अनियमितता दूर होण्यास मदत होते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment