व्हायरल; लॉकडाऊनमुळे पुन्हा एकदा उत्तर प्रदेशातून थेट हिमालयाचे दर्शन


नवी दिल्ली – देशातील अनेक राज्यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय घेतल्यामुळे अत्यावश्यक वाहतूक वगळता इतर वाहतूक व्यवस्था बंद आहेत. यामुळे प्रदूषणात गेल्या काही दिवसात कमालीची घट झाली आहे. हवेत उडणारे सुक्ष्म कण गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे नष्ट झाले आहेत. त्यामुळे प्रदूषणात कमालीची घट झाल्याने आता दृश्यमानता वाढली असल्यामुळे सहारनपूरमधून थेट हिमालयाची शिखरे दिसू लागली आहेत. थेट हिमालयाचे दर्शन होत असल्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटत आहे. तसेच सोशल मीडियावर एवढ्या लांबून घेतलेले हिमालयाचे फोटो व्हायरल झाले आहेत.


देहरादूनजवळील पश्चिम उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्हा आहे. हिमालयाचे शिखर एवढे लांबून दिसू लागल्यामुळे सहारनपूर जिल्ह्यातील आयकर अधिकरी दुष्यंत सिंह यांना आश्चर्य वाटले. आपल्या कॅमेऱ्यात तात्काळ हे फोटो दुष्यंत सिंह यांनी काढले आहे. दुष्यंत यांनी आपल्या वसंत विहार कॉलनीतून हे फोटो क्लिक केले. हिमालयातील गंगोत्री, यमुनोत्री आणि शिवलिक पर्वतरांगा प्रदूषणात घट झाल्याने स्पष्ट दिसू लागल्या आहेत. हे फोटो दुष्यंत सिंह यांनी २० मे रोजी काढले असून हे फोटो आयएफएस अधिकारी रमेश पांडे यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

मागील लॉकडाऊनच्या काळातही हिमालयातील पर्वतरांगा दिसत होत्या. पण यावेळी गंगोत्री, यमुनोत्री आणि शिवलिक पर्वतरांगा स्पष्ट दिसत असल्याचे दुष्यंत सिंह यांनी सांगितले. सोशल मीडियावर हे फोटो वेगाने व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहून नेटकरीही आश्चर्यचकीत होत आहेत. किती प्रदूषण असते यावरुनही चर्चा रंगल्या आहेत.