वेळेआधी केरळमध्ये दाखल होणार मान्सून


नवी दिल्ली – अंदमान निकोबार बेटावर मान्सूनचे आगमन झाल्यामुळे मान्सून केरळमध्ये देखील लवकर हजेरी लावेल हा अंदाज खरा ठरताना दिसत आहे. यापूर्वी हवामान खात्याने केरळमध्ये मान्सून वेळेआधी येईल, असा अंदाज वर्तवला होता. आता अंदमान निकोबार बेटांवर मान्सून सरी बरसल्याने केरळच्या किनारपट्टीवर ३१ मे पर्यंत मान्सूनचे ढग दाटून येतील, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. अंदमानमध्ये सरी कोसळल्यानंतर ७ दिवसात मान्सून केरळ किनारपट्टीवर पोहोचतो.

दरम्यान हवामान विभागाकडून यंदा सरासरीच्या ९८ टक्के अर्थात समाधानकारक पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाकडून यासंदर्भातील परिपत्रक जाहीर करण्यात आले, असून त्यामध्ये याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे. पॅसिफिक महासागर आणि हिंद महासागर यामध्ये होणाऱ्या अनुकूल बदलांमुळे भारतात मान्सून समाधानकारक राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.