रिझर्व्ह बँक खजिन्यातील ९९,१२२ कोटींची अतिरिक्त रक्कम केंद्र सरकारला देणार


नवी दिल्ली – भारतीय रिझर्व्ह बँकेने कोरोनाच्या संकट काळात खजिन्यातील ९९,१२२ कोटी रुपये केंद्र सरकारला वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सेंट्रल बोर्डाने मोठा निर्णय घेतल्यामुळे दिलासा मिळणार आहे. ९९,१२२ कोटी रुपयांची अतिरिक्त रक्कम केंद्र सरकारला वर्ग करण्याच्या प्रस्तावाला बोर्डाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. जुलै २०२० ते मार्च २०२१ या कालावधीतील ९ महिन्यांची अतिरिक्त रक्कम वर्ग करण्यात येणार आहे. हा निर्णय आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला आहे.

आर्थिक स्थिती, जागतिक आणि घरगुती समस्यांचा आरबीआयने सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या बैठकीत आढावा घेतला. तसेच बैठकीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबाबतही चर्चा करण्यात आली. बोर्डाने या कालावधीत रिझर्व्ह बँकेला वार्षिक अहवाल आणि खात्यांसाठी मंजुरी दिली आहे. दरम्यान आरबीआयला विदेशी मुद्रा विक्रीतून चांगली कमाई झाल्याचे सांगण्यात येत आहे.