रॉयल एनफिल्डचा सर्वात मोठा रिकॉल ; परत मागवल्या 2.36 लाख बाईक्स


मुंबई : रॉयल एनफिल्डने 2.36 लाख बाईक्स इग्निशन कॉईलमधील बिघाडाच्या कारणामुळे परत मागवल्या आहेत. मीटियॉर 350, बुलेट 350 आणि क्लासिक 350 चा या बाईक्समध्ये समावेश आहे. कंपनीच्या सांगण्यानुसार वापरात असणाऱ्या काही बाईक्सच्या एका पार्टमध्ये बिघाड झाल्यामुळे, मिसफायरिंग आणि परफॉर्मन्समध्ये काही त्रुटी आढळून येत आहेत. ही तक्रार फार कमी बाईक्समध्ये असू शकते. ही तक्रार डिसेंबर 2020 ते 2021 पर्यंतच्या बाईक्समध्ये असल्याचा अंदाज वर्तवत कंपनीकडून महत्त्वाची पावले उचलली जात आहेत.

सदर बाईक्स परत मागवल्यानंतर गरज पडल्यास त्यामध्ये बिघाड असणाऱे पार्ट बदलण्यात येणार आहेत. कंपनीच्या मते जरी 2.36 लाखांहून अधिक बाईक्स परत मागवल्या असल्या तरी यातील फार कमी बाईक्समध्येच ही तक्रार आढळू शकते. ज्या आयशर मोटर्सशी संलग्न आहेत.

कंपनीच्या सांगण्यानुसार जानेवारी ते एप्रिल 2021 दरम्यान, उत्पादन आणि विक्री करण्यात आलेल्या बाईक्स आता पुन्हा मागवण्यात आल्या आहेत. कंपनीने याच काळातील बुलेटही परत मागवल्या आहेत. हा निर्णय भारत, थायलंड, इंडोनेशिया आणि फिलिपिंससोबत इतरही काही देशांतील बाईक्ससाठी घेण्यात आला आहे.

ही अडचण इंटरनल टेस्टिंगदरम्यान कळून आल्याचे वृत्त आहे. पण सावधगिरी बाळगतच एवढ्या मोठ्या संख्येने या बाईक्स परत मागवण्यात आल्या आहेत. ज्या ग्राहकांच्या बाईक्स परत मागवल्या जात आहेत, त्यांच्याशी कंपनीची सर्व्हिस टीम किंवा लोकल डीलर संपर्क साधणार आहेत.