‘डॅडीं’च्या दगडी चाळीच्या जागी म्हाडा उभारणार ४० मजली टॉवर


मुंबई – अंडरवर्ल्ड डॉन ते राजकारणी असा प्रवास करणाऱ्या अरुण गवळीचे मुंबईतील निवास्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या दगडी चाळीचा पुनर्विकास होणार असल्याची माहिती म्हाडाचे मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्विकास मंडळाचे अध्यक्ष विनोद घोसाळकर यांनी दिली आहे. दगडी चाळमधील सर्व १० इमारतींचा पुनर्विकास होणार आहे. यामधील आठ इमारती अरुण गवळीच्या मालकीच्या असून इतर दोन इमारतीही त्याच्या कुटुंबाने विकत घेतल्या असल्याची माहिती त्यांनी दिली.

लवकरच बिल्डरला पुनर्विकासासाठी ना हरकत प्रमाणपत्र दिले जाईल. दरम्यान भाडेकरुंसाठी इरादा पत्र मंजूर झाले असून त्याआधी पात्र भाडेकरुंची यादी एमबीआरआरबी तयार करणार असल्याचेही घोसाळकर यांनी सांगितले. प्राथमिक योजनेनुसार दगडी चाळीच्या जागी ४० मजली दोन टॉवर उभारण्यात येणार आहे. यामध्ये मूळ भाडेकरुंसाठी घरे असतील आणि उर्वरित घरे विक्रीसाठी उपलब्ध असतील. एकूण ३३८ भाडेकरु दगडी चाळीत असून या संपत्तीचा अरुण गवळी मालक आहे. पुनर्विकासाठी म्हाडाकडे अरुण गवळीने प्रस्ताव पाठवला होता. कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर म्हाडाकडून प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

या प्रकल्पात एमबीआरआरबीला किती घरे मिळतील हे अद्याप निश्चित नाही. इरादा पत्र हे फक्त पहिले पाऊल आहे. नंतर यामध्ये अनेक बदल होण्याची शक्यता असल्याचे घोसाळकर यांनी सांगितले आहे. १० इमारतींमध्ये प्रत्येकी चार मजले असून यामधील दोन इमारती धोकादायक असल्यामुळे आधीच पाडण्यात आल्या आहेत. यामुळे प्रोजेक्ट पूर्ण होईपर्यंत त्या मोकळ्या जागेत भाडेकरुंसाठी तात्पुरती राहण्याची सोय केली जाईल.