‘तोक्ते’नंतर आता किनारपट्टीवर धडकणार ‘यास’ चक्रीवादळ !


नवी दिल्ली – भारताच्या पश्चिम किनारपट्टीशी समांतर प्रवास करत गुजरातच्या किनारी भागात अरबी समुद्रात आय अर्थात केंद्रबिंदू असलेलं तोक्ते चक्रीवादळ धडकले. तोक्ते चक्रीवादळाने या प्रवासादरम्यान केरळ, तामिळनाडू, गोवा, महाराष्ट्र आणि अंतिमत: गुजरात या राज्यांच्या किनारी भागात थैमान घातले. किनारपट्टीच्या भागातली वाहतूक व्यवस्था, वीजपुरवठा या वादळामध्ये मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाला. अखेर मंगळवारी दुपारी या वादळाचा गुजरातच्या किनारपट्टीवर लँडफॉल झाला आणि हळूहळू त्याची तीव्रता कमी झाली.

पण तोक्ते वादळाची तीव्रता कमी होते न होते तोवर आता किनारी भागावर यास चक्रीवादळाची टांगती तलवार निर्माण झाली आहे. जर समुद्रातील कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र झाला आणि त्याचे चक्रीवादळात रुपांतर झाले, तर ते ‘यास’ म्हणून ओळखले जाईल. हे वादळ वातावरणात योग्य ते बदल झाल्यास २६ मेच्या संध्याकाळी किनारी भागात धडकेल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरामध्ये हवामानात होत असलेल्या बदलांमुळे परिस्थिती आधी वादळ आणि त्यात तीव्र बदल झाल्यास त्याचे रुपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात पुढच्या दोन दिवसांमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊ शकतो. त्याचे रुपांतर चक्रीवादळात होण्याचीही शक्यता आहे. विशेषत: हा तीव्र कमी दाबाचा पट्टा अंदमान बेटांजवळच्या सागरी भागात निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, बंगालच्या उपसागरातील परिस्थिती २१ मेपासूनच धोकादायक असणार आहे. वारे वेगाने वाहणार असल्यामुळे समुद्र खवळलेला असू शकतो. त्यामुळे मच्छीमारीसाठी समुद्रात गेलेल्या मासेमारांनी आपल्या बोटी पुन्हा किनाऱ्यावर आणाव्यात, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

हा कमी दाबाचा पट्टा अंदाजे २२ मेपासून उत्तर अंदमानजवळच्या समुद्रात तयार व्हायला सुरुवात होईल. अंदमान-निकोबारमध्ये २२ आणि २३ मे रोजी तुफान पाऊस होण्याची शक्यता आहे. ओडिशा, पश्चिम बंगाल, मेघालय आणि आसाममध्ये देखील अशीच पर्जन्यवृष्टी होईल. हे चक्रीवादळ तयार झाल्यास त्याच्या दिशेनुसार ओडिशा किंवा पश्चिम बंगाल या राज्यांच्या किनारी भागात धडकण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.